औरंगाबाद- मागील गोष्टी माणूस लवकर विसरतो म्हणतात; पण गतवर्षीचा भीषण दुष्काळ यंदा जटवाडा रोड, सारा प्राइड येथील नागरिक चक्क अवघ्या काही महिन्यांतच विसरले. भविष्यात पुन्हा कदाचित पाण्याची टंचाई जाणवेल याचीही या मंडळींना तमा नाही. त्यामुळे बेसुमार पाण्याचा वापर पुन्हा सुरू झाला आहे. पुढील वर्षी पुन्हा पर्जन्यमागन कमी झाले अन् बोअर आटले तर पुढे काय, याचा कोणीही विचार केलेला नाही.
40 हजारांवर लोकसंख्या असलेल्या या भागाला महानगरपालिकेकडून पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे हा परिसर भूगर्भातील पाण्यावर म्हणजेच बोअरवर अवलंबून आहे. माजी आमदार किशनचंद तनवाणी मित्रमंडळ किंवा अन्य कोणाकडून पिण्यासाठी पाणी घेतले जाते. गतवर्षी पिण्यासाठी वरीलप्रमाणे पाणी काही प्रमाणात उपलब्ध होत असले तरी फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात या भागातील बोअर तसेच विहिरींनी ‘राम’ म्हटल्यामुळे पाण्याची पंचाईत झाली होती. वापरासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे उन्हाळा एकदाचा कधी संपतो, जोरदार पाऊस कधी येतो आणि बोअरला पाणी कधी येते या चिंतेत नागरिकांनी कसाबसा उन्हाळा काढला.
पत्रावळ्यांचा वापर अन् सड्यांचा विसर : वापरण्यासाठी विकतचे पाणी घ्यावे लागत होते, पैसे मोजूनही वेळेवर पाणी मिळत नसल्यामुळे या भागातील नागरिकांनी पाण्याचा काटेकोर वापर सुरू केला. गरज असेल तेवढेच पाणी वापरण्यात येत होते. त्यामुळे या भागात घरासमोर सडा टाकणे हा प्रकारही बंद झाला होता. मात्र भांडी धुण्यासाठी होणार्या पाण्याची बचत व्हावी म्हणून काहींनी तर ताटांचा वापर बंद करून थेट बाजारातून पत्रावळी आणून त्यात जेवण सुरू केले होते. त्याचबरोबर येत्या पावसाळ्यापूर्वी जलपुनर्भरण करण्याची प्रतिज्ञाही अनेकांनी केली होती.
पाऊस झाला, सर्व विसरले : जून महिन्यात जोरदार पाऊस झाला, हर्सूल तलावातही पाणी आले अन् जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या भागातील बोअरला पाणी आले. बोअर सुरू झाले आणि त्याबरोबरच येथील नागरिक गतवर्षीची टंचाई विसरून गेले. सद्य:स्थितीत येथे बेसुमार पाण्याचा वापर होताना दिसतो. जलपुनर्भरण करण्याच्या प्रक्रियेचा बहुतांश जणांना विसर पडला आहे. 2013 हे वर्ष अपवाद होते. असे पुन्हा पुन्हा होत नाही, असा युक्तिवाद आता करण्यात येत आहे.