आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद शहरातील उर्वरित नहरींचेही सर्वेक्षण होणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- पाणचक्कीच्या नहरींचे 80 टक्के अंतर्गत सर्वेक्षण पूर्ण करण्यात आल्याचे निवेदन महापालिकेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात करण्यात आले आहे. शहरातील इतर नहरींचे सर्वेक्षण टप्प्याटप्प्याने करण्यात येईल, अशी ग्वाही न्या. नरेश पाटील व न्या. एआयएस चिमा यांच्यासमोर झालेल्या सुनावणीप्रसंगी मनपातर्फे देण्यात आली. आतापर्यंत झालेल्या सर्वेक्षणाच्या कामाचा अहवाल चार आठवड्यात सादर करण्यासाठी मनपाने वेळ मागून घेतला आहे.

खंडपीठाच्या आदेशावरून दोन नहरींच्या संवर्धनासाठी समितीची स्थापना करण्यात आली. समितीने नहर-ए- अंबरी व नहर-ए-पाणचक्कीची पाहणी केली. महापालिकेच्या वतीने अँड. अतुल कराड यांनी दोन नहरींचे बाह्य सर्वेक्षण करण्यात आल्याचे खंडपीठास सांगितले. नहर-ए-पाणचक्कीचे 80 टक्के अंतर्गत सर्वेक्षण केल्याचे सांगून उर्वरित कामासाठी मुदत देण्याची मागणी केली. पावसाळा सुरू झाल्याने नहरींचे अंतर्गत सर्वेक्षण करणे शक्य नसून डिसेंबर 2013 अथवा जानेवारी 2014 नंतर सर्वेक्षण सुरू करण्यात येईल, असे निवेदन केले. दोन नहरींशिवाय शहरात इतरही नहरी आहेत. एकंदरीत शहराच्या नहर व्यवस्थेचे सर्वेक्षण होणे गरजेचे असून या कामी तज्ज्ञांची मदत घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अँड. प्रदीप देशमुख यांच्या वतीने करण्यात आले. यावर मनपाच्या वतीने अँड. कराड यांनी दुसर्‍या टप्प्यात इतर नहरींचा विचार करण्यात येणार असल्याची ग्वाही खंडपीठात दिली.