आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Water Supply By Tanker To Waluj Even In Rainy Season

पाणीटंचाई: भरपावसाळ्यात टँकरच्या पाण्यावर नागरिकांची तहान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज- पावसाळा उलटूनही जलसाठे भरले नसल्याने वाळूज एमआयडीसीतील नागरिकांना टँकरच्या पाण्यावरच तहान भागवावी लागत आहे.

यंदा रिमझिम भिजपाऊस झाला. परिणामी जलस्रोतांतील पाणीसाठा वाढला नाही. त्यामुळे परिसरातील वडगाव कोल्हाटी, बजाजनगर, सिडको आदी भागातील नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत असून त्यांना खासगी टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.

गतवर्षी भीषण पाणीटंचाईमुळे परिसरात उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. एमआयडीसी प्रशासन तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने सुरू असणार्‍या टँकरच्या फेर्‍या जुलैमध्ये बंद करण्यात आल्या. पावसाळ्याच्या सुरुवातीला जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पाणीटंचाईची स्थिती पूर्णपणे निवळण्याची अपेक्षा होती. मात्र जलसाठय़ांत अजूनही पुरेसे पाणी नसल्याने नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. दिवसाकाठी दीडशे ते दोनशे 20 लिटरचे प्लॅस्टीक जार विक्री होत असल्याचे विक्रेते भरत फुलारे यांनी सांगितले.

गैरसोय वाढली

गतवर्षी पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घऊन प्रशासनाच्या वतीने नागरी वसाहतींमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू केला होता. मात्र जुलैच्या शेवटच्या आठवड्यात हे टँकर बंद करण्यात आले. मात्र, जोरदार पावसाअभावी जमिनीतील पाणीपातळी न वाढल्याने बोअरला पुरेसे पाणी येत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.

पाणी विक्रीचा व्यवसाय जोरात

पाणीटंचाई, त्यातच एमआयडीसीचा अशुद्ध पाणीपुरवठा यामुळे परिसरात पिण्याच्या पाण्याचे जार विक्री करणार्‍या गाड्या दूध विक्रेत्यांप्रमाणे नागरी वसाहती, कारखाने, हॉटेल्स आदी ठिकाणी फिरताना आढळून येत आहेत. पाणी विकत घेणे हे नागरिकांच्या प्रतिष्ठेचे लक्षण नव्हे तर त्यांची गरज बनली आहे. नाइलाजास्तव खाजगी टँकरचे पाणी विकत घेण्याचा खर्च नागरिकांना सहन करावा लागत आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून कायमस्वरूपी शुद्ध पाणीपुरवठय़ाची मागणी नागरिकांतून होत आहे.

फोटोः या वर्षी जोरदार पाऊस झाला नसल्याने जमिनीतील पाणीपातळी वाढली नाही. त्यामुळे वाळूज परिसरातील हातपंप कोरडे पडले आहेत.