आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हर्सूल तलावातून आठवडाभरात पाणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - फक्त जायकवाडीवर अवलंबून राहिल्याने शहराच्या पाणीपुरवठय़ावर ताण येत असून त्यावर तोडगा म्हणून हर्सूल तलावातून पुढील आठवड्यापासून रोज 5 एमएलडी पाणी दिले जाणार आहे. यामुळे शहरातील 15 ते 20 वॉर्डांतील पाण्याचा भार कमी होऊन शहरातील पाणीपुरवठा काही अंशी सुरळीत होणार आहे.

अनेक भागांत पाण्याचे वेळापत्रक बिघडलेले आहे. या संदर्भात तक्रारी आल्यानंतर भाजपचे शहराध्यक्ष बापू घडामोडे यांनी उपमहापौर संजय जोशी यांच्याशी चर्चा केल्यानंतर बुधवारी याबाबत जोशी यांनी एक बैठक बोलावली. त्यात कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, 3 उपअभियंते व सर्व कनिष्ठ अभियंते उपस्थित होते. पैठण ते शहर आणि शहरातील पाणी वितरण अशा दोन्ही टप्प्यांत येणार्‍या समस्यांवर त्यात चर्चा करण्यात आली.

जोशी म्हणाले की, 4 ऑक्टोबरला दुरुस्तीसाठी पाणीपुरवठय़ाचे शटडाऊन करण्यात आले. त्या दिवशी 62 एमएलडीच पाणी आले.

छावणीला मुबलक पाणी : दुसरीकडे छावणीला पाणीपुरवठा करणार्‍या पाइपलाइनवरील दोन्ही व्हॉल्व खराब झाले होते. मुख्य 1400 मिमी जलवाहिनीवरील हे दोन व्हॉल्व मागील 20 दिवसांपासून बंदच होत नव्हते. शिवाय छावणीकडे जाणार्‍या पाइपलाइनला गुरुत्वाकर्षणाचा फायदा असल्याने त्या भागात 24 तास पाणी अव्याहत सुरू होते. अखेर 20 दिवसांनंतर या व्हॉल्वची दुरुस्ती करण्यात आली.

जुन्या शहराला होणार पुरवठा
दुष्काळामुळे हर्सूलचा तलाव पूर्ण आटल्याने औरंगाबाद शहराला फक्त जायकवाडीच्या पाण्यावर विसंबून राहावे लागत आहे. आता हर्सूलच्या तलावात पाणीपातळी 20 फुटांपर्यंत आल्याने पाणीपुरवठा सुरू करता येऊ शकतो, अशी स्थिती आहे. येत्या आठ दिवसांत हर्सूल तलावातून शहराला पाणीपुरवठा पुन्हा सुरू केला जाईल, असे कार्यकारी अभियंता कोल्हे यांनी सांगितले. यामुळे 5 एमएलडी पाणी शहरातील 15 ते 20 वॉर्डांना मिळणार आहे. तेवढाच जायकवाडीतून येणार्‍या पाण्यावरचा भार कमी होईल, असे उपमहापौर जोशी म्हणाले.

पाणीपुरवठय़ाला शिस्त लावणार
यापुढे प्रत्येक नगरसेवकाला पाणी येणार की नाही, उशिरा येणार असेल, तर कधी येणार, असे एसएमएस पाठवण्यात येतील. शिवाय प्रत्येक लाइनमनकडे एक डायरी दिली जाणार असून त्यात पाणी कधी आले याच्या नोंदी नगरसेवकाकडूनच घेतल्या जातील. यामुळे पाण्याबाबतच्या तक्रारी कमी होतील, असा विश्वास जोशी यांनी व्यक्त केला.