आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडीच दिवसांत खासगी टँकरच्या दोन हजार फेऱ्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दोनदिवसांच्या पाणी संकटानंतर आज दुपारपासून शहराच्या काही भागांत पाणीपुरवठा सुरू झाला. उद्या काही भागांत कमी दाबाने पाणी येणार असले तरी दुपारपर्यंत सर्व पुरवठा सुरळीत होईल, असा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, या पाणी संकटाचा फायदा उचलत शहरात गेल्या दोन दिवसांत खासगी पाणी विक्रेत्यांनी दोन हजार फेऱ्या करून चांगलीच कमाई केली.

औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने १५ तारखेला घेतलेले २४ तासांचे शटडाऊन तब्बल ३४ तासांचे झाले काल रात्रीपासून शहरातील ५८ टाक्यांत पाणी यायला सुरुवात झाली. सर्वच टाक्या कोरड्या ठाक झाल्याने या कामाला विलंब झाला. आज दुपारी पाण्याची लेव्हल यायला सुरुवात होताच काही भागांत पाणी सोडण्यात आले. दुपारी वाजेपर्यंत बऱ्याच भागांत कमी दाबाने का होईना पाणीपुरवठा सुरू झाला होता. उद्या गुरुवारी पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने म्हटले आहे.

नगरसेवक सूर्यकांत जायभाये यांनी सांगितले की, पुंडलिकनगर भागात पंधरा तारखेला रात्री काही भागांत पाणी सोडण्यात आले होते. शिवाय १६ तारखेला ज्या भागात पाणी येणार होते त्या भागासाठीही काही प्रमाणात पाणी सोडण्यात आले होते. या उपरही या भागांत एका दिवसांत खासगी टँकरच्या सुमारे दोनशे फेऱ्या झाल्या. पंकज भारसाखळे यांनीही पाणी वितरणात आलेल्या अडचणीमुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला, असे सांगितले. बुधवारी काही भागांत पाणी आले नाही. जटवाडा परिसरात पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागली.
टँकरवाल्यांची चांदी
अडीचदिवसांच्या या पाणी संकटाचा सर्वाधिक फायदा खासगी टँकर व्यावसायिकांनी करून घेतला. दोन हजार लिटरच्या टँकरमागे सरसकट दीडशे ते दोनशे रुपयांची वाढ करीत त्यांनी नागरिकांची अक्षरश: लूट केली. आम्हालाच पाणी महाग मिळते असे कारण सांगत त्यांनी ही दरवाढ केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील आणी लगतच्या परिसरातील विहिरींचे पाणी विकत त्यांनी गब्बर कमाई या अडीच दिवसांत केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात या काळात दोन हजार टँकर फेऱ्या झाल्या.

मोफत पाण्याकडे गर्दी
गुलमंडीवरीलतनवाणी मित्रमंडळाच्या वतीने शहरात मोफत पाणीपुरवठा केला जातो. दोन दिवसांच्या पाणी संकटात या सेवेचा फायदा घेणाऱ्यांची गर्दी झाली होती. गुलमंडीवरील केंद्रात पाण्यासाठी नागरिकांनी गेल्या दोन दिवसांत गर्दी केली होती. मंडळाच्या वतीने एरवी एका दिवसांत हजार जार पाणीपुरवठा केला जातो. मात्र, सोमवारपासून त्यात वाढ झाली. दिवसाला दीड हजार जारची मागणी वाढली होती. शिवाय जवळपासच्या नागरिकांनी हंडे भांडी घेऊनही या केंद्रातून पाणी नेल्याची माहिती माजी आमदार किशनचंद तनवाणी यांनी दिली.