आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजपासून शहरातील सर्व भागांत होणार तासभर पाणीपुरवठा!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - समांतरचे काम करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीसोबतचा करार महानगरपालिकेने शनिवारी रद्द केला. रविवारी पाणीपुरवठा यंत्रणा ताब्यात घेत शहरातील सर्व वाॅर्डांत समन्यायाने आणि पुरेशा दाबाने तासभर पाणीपुरवठा करण्याचा आनंददायी निर्णय घेतला. मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सोमवारपासून ६० मिनिटे पाणी पुरवठा करण्याचे आदेश देतानाच पाणीपुरवठ्याच्या कामात कामचुकारपणा करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची गय करणार नाही, अशी तंबीही दिली.
शहराचा पाणीपुरवठा पालिकेच्या ताब्यात येताच पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी तसेच काम करण्यात येणाऱ्या अडचणी त्यावरील उपाययोजना राबवण्यासाठी बकोरिया यांनी सकाळी अकरा वाजता मनपाच्या अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेतली. सुरुवातीलाच अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठ्यासाठी ३९१ कर्मचाऱ्यांची गरज अाहे. सध्या २६७ कर्मचारी सेवेत असून ते खासगी कंपनीने कामावर घेतले होते, असे सांगितले. त्यावर आयुक्तांनी कंपनीला दिलेले सर्व कर्मचारी परत मनपाच्या सेवेत घेऊन कामाचे नियोजन करण्याचे आदेश दिले. तसेच आस्थापना विभागालाही कर्मचारी भरतीचे आदेश दिले.

मुख्यपाइपलाइनसाठी शासनाची परवानगी
मुख्य पाइपलाइनचे काम करण्यासाठी मनपाच्या वतीने शासनाच्या नगरविकास विभागाच्या सचिवांना पत्र पाठवण्यात आले आहे. त्यांच्या सूचनेनुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे. त्याचबरोबर खासगी कंपनीसोबतचा करार रद्द करण्यात आल्याचे पत्रही शासनाला पाठवण्यात आले आहे.

जलकुंभावरून कोणत्या भागासाठी किती पाणी सोडले याची नोंद ठेवली जाणार आहे. त्यामुळे नियमित पाणी पुरवठा करण्यासाठी किती वेळ लागला, किती वेळ कोणत्या भागाला पाणी दिले याची माहिती मिळेल. हयगय केल्यास संबंधित लाइनमन , कर्मचाऱ्यांची गय करणार नाही, असे बकोरिया यांनी सांगितले.

नागरिकांच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी खासगी कंपनीच्या धर्तीवरच मनपाच्या नऊ प्रभाग कार्यालयांत इनवर्डचे काम करणाऱ्या लिपिकामार्फत तक्रारी स्वीकारल्या जातील. त्या तत्काळ वॉर्ड अभियंत्याकडे देऊन या तक्रारींचे तत्काळ निवारण करण्याचे आदेशही देण्यात आले.
पाणी पुरवठ्यासाठी मनपाला ३९१ कर्मचाऱ्यांची गरज असून कपंनीकडे मनपाचे २९६ कर्मचारी कार्यरत होते. त्यापैकी २९ निवृत्त झाले आहेत. त्यामुळे सध्या २६७ कर्मचारी असून अजून १२४ नवीन कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. यात २५ अभियंते, २२ लाइनमन, ३१ पंपऑपरेटर आणि ३२ मजुरांची गरज आहे.

१२४ कर्मचाऱ्यांची गरज
दूषित पाण्याविषयी वाढत्या तक्रारी सोडवण्यासाठी जलदगतीने प्रयत्न करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. यासाठी खासगी कंपनीकडे कार्यरत असलेले पाच व्हेंडर मनपामध्येही काम करणार आहेत. त्यामुळे वेळेवर काम होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर नियमित १५ ते २० एमएलडी पाणी लिकेजमुळे वाया जात असल्याने त्यावर नियंत्रण ठेवण्याचेही आदेश देण्यात आले.

पाण्याचे सम वाटप
खासगी कंपनीकडून शहरातील काही भागांना अर्धा तास, एक तास तर काही भागांना तब्बल दोन तास पाणी देण्यात येत होते. हा भेदभाव महानगरपालिकेला परवडणारा नसल्याने शहरातील सर्व भागांना सम प्रमाणातच पाणी वाटप करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. दहा लाख रुपयांचे पाणी शुद्धीकरणासाठीचे औषध खरेदी करण्यासही बकोरिया यांनी मंजुरी दिली.
बातम्या आणखी आहेत...