आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन दिवसांत १८ वाॅर्डांतील ८० हजार लोकांना पाणीपुरवठा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - निजामाने१९५४ मध्ये शहराला हर्सुल तलावातून पाणीपुरवठ्याची व्यवस्था केली होती. सध्या या तलावातून शहरातील १८ वॉर्डांना पाणीपुरवठा करण्याची सुविधा आहे. मात्र मे २०१६ पासून तलावातील पाणी आटल्याने पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. सध्या पाण्याची आवक सुरू असल्याने वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा तलावात उपलब्ध आहे. दोन-तीन दिवसांत या तलावातून पाणीपुरवठा सुरू होणार आहे.
शहराला पाणीपुरवठा होण्यासाठी ओहर येथून येणाऱ्या नदीवर तत्कालीन निजाम सरकारने हर्सुल तलाव तयार केला होता. त्यातून जुन्या शहराला ग्रॅव्हीटी पाइपलाइनच्या माध्यमातून प्रचंड दाबाने पाणीपुरवठा होत होता. आताही १८ जुन्या वॉर्डांना तलावातून नियमित पाच एमएलडी पाणी उपसून पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे जायकवाडीतून येणाऱ्या पाण्याचा कमी वापर या वॉर्डांत होतो. मात्र उन्हाळ्यात पाणी आटल्यावर पाणीपुरवठा काही महिन्यांसाठी बंद करण्यात आला होता. या तलावातून गेल्या वर्षी दिवाळीनंतर म्हणजे १६ डिसेंबर २०१५ रोजी पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. त्यावेळी त्याची पाणीपातळी १४ फूट होती. त्यानंतरही हे पाणी दुष्काळ असूनही तब्बल पाच महिने पुरले. मे २०१६ रोजी पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. यंदा तलावात १९.५० फूट पाणी असून अद्यापही पाण्याची आवक सुरू आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणी जास्त असल्याने उन्हाळ्यातही पाणी कमी पडणार नसल्याचा विश्वास जाणकारांनी व्यक्त केला. तलाव आणि शुद्धीकरण केंद्र राजनगर, चेतनानगर वॉर्डात येत असून येथील नगरसेविका ज्योती जयेश अभंग यांनी चाचणीपूर्वी तलावासह शुद्धीकरण केंद्राची पाहणी केली.

दिल्लीगेट येथील टाकीत जाते पाणी : तलावातूनउपसा करण्यात येणारे पाणी थेट दिल्लीगेट येथील आयुक्तांच्या बंगल्याजवळील टेकडीमध्ये दोन भ्ूमिगत टाक्यांत जाते. तेथून शहागंज पाण्याच्या टाकीत देण्यात येते. विशेष म्हणजे हे सर्व ठिकाणी कोणत्याही विद्युत पंपाच्या मदतीशिवाय देण्यात येते. या पाण्यावर जुन्या शहराची तहाण भागवली जाते.

...तर पाणीपुरवठा होऊ देणार नाही
^आमच्या वॉर्डात तलाव आणि जलशुद्धीकरण केंद्र असूनही आमच्या वॉर्डालाच पाणी मिळत नाही. त्यामुळे आमच्या वॉर्डाला पाणी देत नाही, तोपर्यंत आम्ही शहराला पाणीपुरवठा होऊ देणार नाही. -ज्योती जयेश अभंग, नगरसेविका

या वसाहतींना दिल्ली गेट जलकुंभातून पुरवठा
आरेफ कॉलनी, किले अर्क, चाऊस कॉलनी, रोझा बाग, धावणी मुहल्ला, गणेश कॉलनी, कटकट गेट, लेबर कॉलनी, विश्वासनगर, हर्षनगर, फाजलपुरा, मुजीब कॉलनी, बुढी लेन, शताब्दीनगर, अबरार कॉलनी, मोहनलालनगर.

यशस्वी चाचणी, लवकरच पाणीपुरवठा
^मंगळवारी जलशुद्धीकरण केंद्राची पाइपलाइन व्यवस्थित आहे किंवा नाही याची चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाली असून २-३ दिवसांत पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न आहे. -सरताज सिंग चहल, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा
बातम्या आणखी आहेत...