आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीनंतर संपूर्ण शहरात तीन दिवसांआड पाणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद -मंगळवारी सिडको-हडकोच्या काही भागांत आठ तास उशिराने पाणी आले. परिणामी बुधवारी सकाळी सात वाजेपासून शिवसेना-भाजपच्या नगरसेवकांनी सिडको एन-५ येथील पाण्याच्या टाकीसमोर ठिय्या आंदोलन केले. आयुक्त संशोधक केंद्रात असल्याची माहिती मिळताच आंदोलनकर्ते त्यांना भेटण्यासाठी गेले. महत्त्वाची बैठक सुरू आहे. थोडा वेळ थांबा, असे म्हणत आयुक्तांनी नगरसेवकांना बाहेरचा रस्ता दाखवला. आयुक्तांकडून मिळालेल्या वागणुकीमुळे नगरसेवक संतापले आणि त्यांनी भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांना मध्यस्थीसाठी बोलावले. महापौर दालनात आयुक्तांसमवेत बैठक झाली. शहराच्या काही भागांत दोन तर काही भागांत तीन दिवसांआड पाणी येते. ही पद्धत बंद करून नोव्हेंबरपासून संपूर्ण शहराला तीन दिवसांआडच पाणी मिळेल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

सिडको एन-५, एन-७ येथील जलकुंभ जुलैपासून भरले जात नसल्याने कमी दाबाने पुरवठा होतो. तीन महिन्यांत नऊ वेळा खंडणकाळ घेतल्याने नागरिकांनी थेट आठव्या दिवशी पाणी मिळते. खंडणाची अथवा उशिरा पाणी येण्याची कल्पना नगरसेवकांना देण्यात येत नाही. तक्रारीसाठी नगरसेवकांनी कॉल केले असता, अधिकारी उत्तर देत नाहीत. मंगळवारी हडको-सिडको भागात आठ तास उशिराने पाणी आल्याने भाजप-शिवसेनेच्या संतप्त नगरसेवकांनी एन-५ च्या जलकुंभावर ठिय्या दिला. दरम्यान, भाजप गटनेते भगवान घडामोडे यांनी मनपा आयुक्तांना घटनास्थळी येण्याची विनंती केली. मात्र, त्यांनी सर्वांना संशोधन केंद्रात बोलावले. सर्वजण केंद्रात गेले. १५ मिनिटे थांबूनही आयुक्त बाहेर आले नाही.

नगरसेवक नितीन चित्ते बैठक सुरू असताना आत गेले अाणि आयुक्तांना बाहेर येण्याची विनंती केली. दहा मिनिटे बसा मी येतोच, असे सांगितले. चित्ते पुन्हा १५ मिनिटांनी आयुक्तांकडे गेले आणि आपली बाहेर प्रतीक्षा करत आहोत. आपल्याला वेळ नसेल तर आम्ही आपल्या दालनात जाऊन बसतो, असे सांगितले. त्यावर काय करायचे ते करा, असे आयुक्त म्हणताच सर्वांचा पारा चढला. त्यांनी थेट आयुक्तांचे दालन गाठले. दरम्यान, तनवाणी यांनाही मनपात बोलावून घेतले. तनवाणी यांनी महापौरांची भेट घेऊन आयुक्तांना बोलावून घेतले. महापौरांना कॉल केल्यानंतर आयुक्त १५ मिनिटांनी महापौर दालनात आले.

महापौर दालनात नगरसेवकांनी पाण्याच्या नियोजनाचे काय, असा सवाल आयुक्तांना केला. शिवाजीनगर, पुंडलिकनगरच्या पाण्याच्या जलकुंभाचे पाणी कमी करून एन ५, एन च्या जलकुंभावर वाढवून देण्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. या नियोजनाला सभागृहनेता राजेंद्र जंजाळ यांनी विरोध केला. आतापर्यंत व्यवस्थित पाणीपुरवठा सुरू होता, आताच बदल करण्याचे कारण काय, असे त्यांनी विचारले. स्थायी समिती सभापती मोहन मेघावाले, विरोधी पक्षनेता आयुब जागीरदार, नंदकुमार घोडेले, राजू शिंदे, राज वानखेडे, राहुल रोजतकर, विजय औताडे, किशोर नागरे, मकरंद कुलकर्णी, गंगाधर ढगे, बबिता चावरिया, वीरभद्र गादगे, शिवाजी दांडगे, प्रशांत देसरडा, गजानन बारवाल, माधुरी देशमुख, बाळासाहेब मुंढे, विकास जैन, कचरू घोडके, महेश माळवतकर उपस्थित होते.

ऑडिटकरण्याची सूचना : शहरातयेणारे पाणीही पूर्वीप्रमाणे येत आहे. उलट तीन एमएलडी पाण्याची वाढ झाली तरी पाणी पुरत नाही. आता पाण्याचे ऑडिट कराच, असा अाग्रह तनवाणी आणि नंदू घोडेले यांनी धरला. जेथे आयुक्तांनी नगरसेवकांना भेटण्यासाठी बोलावले होते, तेथे मालमत्तांच्या सर्वेक्षणांचा घोळ निस्तारण्याचे काम सुरू होते. अगोदर व्यवस्थित प्रक्रिया होऊनही पुन्हा नव्याने निविदा काढण्याचे काम करणाऱ्या प्रशासनाला बाजूला सावरून पुढील कामे मर्जीतील ठेकेदारांना देण्यासाठी बैठक सुरू होती.

एक्स्प्रेसलाइनवरच कनेक्शन : नक्षत्रवाडीतून१२०० एमएमची एक्स्प्रेस लाइन थेट वेदांतनगर पाणी टाकी, पुंडलिकनगर, एन ५, एन येथील पाण्याच्या टाक्यांमध्ये जोडली. वेदांतनगरला सर्वाधिक तर पुंडलिकनगर, शिवाजीनगर या टाक्यांना जास्त पाणी मिळत असल्याने एन आणि एन च्या पाण्याच्या टाक्यांना कमी पाणी मिळते. म्हणून पुंडलिकनगर आणि शिवाजीनगरचे पाणी कमी करणार आहे.

आयुक्त आज मुंबईत
महानगरपालिकेनेखासगी कंपनीच्या पीपीपीचा प्रस्ताव रद्द करून मनपाने हस्तांतरित करून घेतला आहे. यात मुख्य पाइपलाइनचे काम करण्यासाठी शासनाकडे मनपाने प्रस्ताव पाठवला आहे. त्याला मंजुरी मिळण्यासाठी गुरुवारी आयुक्त आणि कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल मुंबईला जाणार आहेत.

तनवाणींची मध्यस्थी...
तुम्हीबाहेर बसा, तसेच तुम्हाला काय करायचे ते करा, असा शब्दप्रयोग आयुक्तांनी करायला नको, असे सुनावले. नगरसेवकांना आपल्याला भेटण्याची अथवा कामे सोडून जलकुंभावर जाऊन बसण्याची हौस नाही. नगरसेवक एकटा आपल्याला भेटतो, पण त्याला वॉर्डातल्या २०० नागरिकांना तोंड द्यावे लागते. पाण्यापेक्षा आपली बैठक महत्त्वाची होती का, असा सवाल त्यांनी केला.

...अन् विनाअंघोळीचे आले
वॉर्डात पाणी नसल्याने नागरिकांनी नगरसेवकांचे घर गाठले होते. त्यामुळे चित्ते यांच्यासह अनेक नगरसेवक विनाअंघोळीचेच नागरिकांच्या प्रश्नांसाठी जलकुंभावर गेले ोते, पण आयुक्तांनी तेथे भेट देता संशोधन केंद्रातूनही घालूवन दिल्याने सर्वांनीच नाराजी व्यक्त केली.

बकोरियाजी, वाईट प्रवृत्तींना संधी देऊ नका
शहरातल्या पाण्याच्याटाक्यांमध्ये पुरेसे पाणी येते की नाही, हे ठामपणे कोणीच सांगू शकत नाही; पण आयुक्तांमध्ये किती 'पाणी' आहे, हे त्यांनी दाखवून दिले. शहरातले १३ नगरसेवक सुमारे दीड लाख लोकांच्या पाण्याच्या प्रश्नावर एकत्र येऊन भेट मागत असताना आयुक्त बकोरिया यांना कंत्राटाच्या तांत्रिक बाबींसाठीची बैठक महत्वाची वाटली आणि त्यांनी नगरसेवकांना बाहेर थांबण्याचा सल्ला दिला. हे 'पाणीदार' असण्याचेच लक्षण नाही का? अर्थात, आयुक्तांमधले असे पाणी औरंगाबादकरांना अपेक्षित नाही. आयुक्त म्हणून प्रसंगी लोकप्रतिनिधींच्या विरोधात जाऊन जनहिताचे जे जे निर्णय त्यांनी घेतले आहेत, त्यासाठी 'दिव्य मराठी'ने त्यांची पाठराखणच केली आहे; पण पाण्यासारख्या प्रश्नापेक्षा त्यांना निविदेतल्या अटी-शर्ती महत्वाच्या वाटत असतील तर त्याचे समर्थन करता येणार नाही. लोकप्रतिनिधी हे नेहमीच चुकीचे असतात, असेच आयुक्त बकोरिया गृहीत धरत असतील तर त्यांनी आपली भूमिका नीट तपासून घ्यायला हवी. खासगी कंपनीला रोज पाणीपुरवठा करण्यासाठी आग्रह धरला जात असेल आणि ती कंपनी काही ठिकाणी तसा पुरवठा करीतही असेल तर महापालिकेकडून तशी अपेक्षा का करू नये? निदान आहे ती परिस्थिती खराब होऊ नये, अशी अपेक्षा तर नक्कीच चुकीची नाही. अशाने वाईट प्रवृत्तींनाही बोट दाखवायची संधी मिळते, हे बकोरियांनी लक्षात घ्यावे.
- दीपक पटवे, निवासी संपादक
बातम्या आणखी आहेत...