आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलकुंभ अन् पाइपलाइनवर बसवणार इनलेट मीटर! नागरिकांना मिळणार मुबलक पाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहरासाठी जायकवाडी धरणातून १३० एमएलडी पाणी उपसा करण्यात येतो. मात्र जीर्ण पाइपलाइनला ठिकठिकाणी गळती लागत असल्याने पूर्ण पाणी शहरापर्यंत पोहोचत नाही.
परिणामी अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांची ओरड होते. ही ओरड थांबवण्यासाठी तसेच पाण्याचे मोजमाप करण्यासाठी समांतर कंपनीच्या वतीने जायकवाडी ते नक्षत्रवाडी तसेच शहरातील जलकुंभ आणि महत्त्वाच्या पाइपलाइनवर इनलेट मीटर बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

सध्या शहरात नळांना मीटर बसवण्याचे काम समांतरने थांबवले आहे. तिसऱ्या दिवशी पाणी येत असल्याने नळाला मीटर बसवण्याची काय गरज, असा प्रश्न शनिवारी उपस्थित करून मनपा आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी नळांना मीटर लावण्यास हरकत घेतली आहे. जायकवाडीतून पाणी तर येते, मात्र सगळे पाणी शहराला मिळत नाही. समांतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत पाहणी केली. त्यात गळती शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा काहीच फायदा झाला नव्हता. त्यामुळे थेट पाइपलाइनवर विविध ठिकाणी मीटर बसवून नेमके कोणत्या ठिकाणी गळती होते, याची माहिती घेण्यासाठी हा प्रयोग करण्यात येत आहे.

समप्रमाणातपाणी वितरण : मीटरमुळेसर्व आकडेवारी समोर येणार असल्याने कमी-जास्त पाणी येते, अशी होत असलेली ओरड थांबेल. सर्व भागांना समप्रमाणात पाणीपुरवठा करता येईल.
नक्षत्रवाडी ते जायकवाडीपर्यंत १३ ठिकाणी मीटर लावण्यात येणार आहेत. यामुळे नेमकी कोणत्या ठिकाणी गळती सुरू आहे, याचे मोजमाप करता येणार आहे.
तिन्ही पाइपलाइनला प्रत्येकी एक असे तीन इनलेट मीटर बसवण्यात आले असून एकूण ४१ मीटर बसवण्यात येणार अाहेत.

शहराला ५६ आणि १०० एमएलडी पाणीपुरवठा करणाऱ्या तीन पाइपलाइनसह २५ जलकुंभांवर इनलेट मीटर बसवण्याचे काम करण्यात येणार आहे.

मीटरचे फायदे : शहरासाठीजायकवाडीतून अंदाजे १३० एमएलडी पाणी उपसा होतो. मात्र नेमके किती पाणी शहरापर्यंत येते याची निश्चित माहिती समोर येईल. शहरातील कोणत्या भागाला नेमके किती पाणी कोणत्या दिवशी दिले याची अचूक माहिती कळेल. जायकवाडी ते नक्षत्रवाडी किती पाणी गळती होते याचाही आकडा समोर येईल. तसेच शहरात किती पाणी आले, त्याचे वितरण कसे झाले याची नोंदही मनपासह नागरिकांना घेता येईल. त्याचबरोबर खासगी कंपनी, ग्रामपंचायती इतर ठिकाणी किती पाणी दिले जाते याचाही ताळमेळ घालणे सोपे होईल.

नियोजन करता येईल
इनलेटमीटर लावण्यामुळे काही भागात कमी-जास्त प्रमाणात दिल्या जाणाऱ्या पाण्याचे नियोजन करता येईल. तसेच सर्वच भागांत समान पाणीपुरवठा करणे कंपनीला सोपे जाणार आहे. अविक बिस्वास, समांतर,संवाद जनसंपर्क प्रमुख

पाणी पोहोचवणे आवश्यक
पाणी पोहोचवणे हे कंपनीचे काम असल्याने नीट पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न करत आहोत. गळती होत असल्याने नागरिकांना पाणी कमी मिळते. या मीटरमुळे गळती रोखून चांगला पाणीपुरवठा करता येईल. सोनल खुराणा, समांतरप्रकल्प प्रमुख