आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जोगेश्वरीत जीर्ण जलकुंभाची दहशत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज - जोगेश्वरीतील जलकुंभ मोडकळीस आला असून तो कोणत्याही क्षणी कोसळून दुर्घटना होण्याची भीती आहे. हा जलकुंभ जमीनदोस्त करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात आला असून तो लालफितीत अडकून पडला आहे. दरम्यानच्या काळात काही अप्रिय घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.

ग्रामपंचायतीने गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी 1982 मध्ये जलकुंभाची उभारणी केली होती. मागील दोन दशके या जलकुंभातून गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात आला. मात्र, हा जलकुंभ जीर्ण झाल्याने त्याचे खांब हलू लागले आहेत. जागोजागी प्लास्टरही गळून पडत आहे. त्यामुळे हा जलकुंभ कोणत्याही क्षणी कोसळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे जोगेश्वरी ग्रामपंचायतीने यासंदर्भात गंगापूर पाणीपुरवठा विभागाकडे जलकुंभ जमीनदोस्त करण्याचा प्रस्ताव पाठवला. मात्र, प्रशासनाच्या लालफीतशाही कारभारामुळे हा प्रस्ताव पडून आहे. परिणामी धोकादायक पाण्याची टाकी आहे तशीच उभी आहे. या जलकुंभालगत गावातील मुख्य रस्ता असल्याने कायम रहदारी असते. त्यातच जलकुंभ कोसळल्यास मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.