आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देवळाई-साताऱ्याचे टँकर बंद, मनपात समावेश होताच प्रशासनाची कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सातारा-देवळाईचा महापालिकेत समावेश होताच जिल्हा प्रशासनाने या भागातील टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद केला. त्यामुळे दोन दिवसांपासून नागरिकांची गैरसोय होत आहे. या भागातील नागरिकांना पाणीटंचाईचे चटके बुधवारपर्यंत सोसावे लागणार आहेत. महापौर त्र्यंबक तुपे यांनी शुक्रवारी साताऱ्याला भेट दिली; परंतु त्यांनी पाणीप्रश्नाला बगल देत
शासनाच्या जमिनी, अतिक्रमण या विषयांवर भर दिला.

नगर परिषदेचा महानगरपालिकेमध्ये १८ मे रोजी समावेश केल्यामुळे पाणी टँकर ठेकेदारांनी जिल्हा प्रशासनाला यासंदर्भात लेखी अर्ज करून पाण्याचे टँकर बंद केेले. टँकर बंद करण्यापूर्वी मनपा अधिकाऱ्यांना कळवण्यात आल्याचे ठेकेदारांनी सांगितले; परंतु त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद न आल्याने आम्ही टँकर बंद करत असल्याचे सांगण्यात आले. सत्ताधिकाऱ्यांकडून केवळ भेटी देऊन बांधकाम, बिल्डर व ओपन स्पेसबद्दलच चर्चा होत आहे. सामान्यांसाठी अत्यावश्यक असणाऱ्या पाण्याच्या टँकरसंदर्भात मात्र कुणीही गंभीर नसल्याचे दिसत आहे.
महापौर त्र्यंबक तुपे यांनी दोन्ही भेटींत स्थानिक गरजांना आधी प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले. मनपा अधिकाऱ्यांनी सातारा येथील पाण्यासंदर्भात गुंठेवारीच्या नियमांनुसार पाणी विकण्याचा प्रस्ताव ठेवण्याचा विचार केल्याचे कळले; परंतु पुर्वी जिल्हा प्रशासनातर्फे २० टँकर मोफत दिले जात असताना आता पाणी कसे विकावे, असा प्रश्न उपस्थित केला.

२० टँकरद्वारे होत असे पुरवठा
सातारा- देवळाईमध्ये एकूण २० टँकर पुरवले जात हाेते. एका टँकरद्वारे तीन फेऱ्यांचा दावा नगर परिषदेकडून करण्यात येत होता; परंतु प्रत्यक्षात मात्र केवळ एक ते दाेनच फेऱ्या होत होत्या. त्याद्वारे किमान पिण्यापुरते तरी पाणी मिळत होते. आता सातारा- देवळाईचा मनपामध्ये समावेश केला; परंतु तेथील पाण्याचे नियोजन जमत नसल्याने पाण्याचे टँकर पुन्हा जिल्हा प्रशासनाच्या गळ्यात अडकवण्याचा विचार मनपा करत आहे.

०४ एमएलडी पाण्याची गरज
६० हजार लोकसंख्या
रु. ४०० पाणी टँकर
३५ रुपयांना एक बॅरल
०३ बॅरल एका कुटुंबाला किमान लागतात.

टँकर पुरवावेत
अजून सहा महिने जिल्हा प्रशासनाने पाण्याचे टँकर पुरवावेत, त्यामुळे आम्हाला इतर गोष्टींचे नियोजन करता येईल. यासंदर्भात लवकरच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणार असून त्यासाठी बोलणी करणार आहे.
त्र्यंबक तुपे, महापौर.