आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील टँकरची पुन्हा शतकी वाटचाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - गतवर्षी सरासरीच्या निम्माच पाऊस झाल्याने औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत टँकर सुरू करावे लागले. मे महिन्यात हा आकडा 739 इतका झाला होता. त्यानंतर जून महिन्यात पावसाला सुरुवात झाली. भिजपावसामुळे पिके चांगली असली तरी जलस्रोतांमधील साठा वाढला नाही. तरीही जुलैअखेरीस जिल्ह्यातील सर्व टँकर बंद झाले होते. मात्र, जोरदार पाऊस न झाल्याने ऑगस्टच्या दुसर्‍या आठवड्यात पुन्हा टँकर सुरू झाले. 5 सप्टेंबरपर्यंत ही संख्या 73 वर गेली असून येत्या आठवड्यात जोरदार पाऊस न झाल्यास ही संख्या शंभरी पार करण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील निम्मे प्रकल्प कोरडेठाक असल्याने पाणी कोठून आणायचे, असा प्रश्न भरपावसाळ्यातही कायम आहे. येथून पुढील 9 महिन्यांसाठी पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. मे महिन्यात 739 टँकर, त्यानंतर जुलै महिन्याच्या शेवटी शून्य आणि आता पुन्हा 73 असा जिल्ह्यातील टँकरचा प्रवास आहे. टँकरच्या एका खेपेसाठी सरासरी अडीच हजार रुपये खर्च होतात. त्यामुळे खर्चाचा आकडाही वाढताच आहे.