आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलसंकट: वेळेवर टँकर मिळत नसल्याने वादावादी, हाणामार्‍यांचे प्रकार वाढले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- पाणीटंचाईचा मुकाबला करण्यासाठी मनपाने 67 टँकरच्या 500 फेर्‍या करीत रोज 20 लाख लिटर पाणी शहराच्या विविध भागांत देणे सुरू केले असले तरी टँकरच्या कारणावरून वेळोवेळी होणारे संघर्ष आणि वाद पाहता टँकरची व्यवस्था पुरेशी नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान, मंगळवारी रात्री टँकर लवकर न पाठवल्यावरून विद्यापीठ परिसरातील मनपाच्या केबिनची तोडफोड करून लाइनमनला मारहाण करण्याचा प्रकार घडला.

औरंगाबाद शहराला भेडसावणार्‍या पाणी संकटाचा मुकाबला करण्यासाठी मनपाने टँकर सुरू केले आहेत. शहराच्या विविध भागांत मनपातर्फे 67 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवले जाते. या टँकरच्या दिवसातून किमान 500 फेर्‍या होत आहेत. थोडक्यात, दिवसाला 20 लाख लिटर पाणी मनपा टँकरच्या माध्यमातून पुरवत आहे. या कामासाठी मनपाने 45 लाख रुपयांची तरतूद केली आहे. याशिवाय खासगी टँकरची सेवा आहे ती वेगळीच. एवढे असूनही टँकरबाबतच्या तक्रारी वाढतच आहेत. यावरून ही यंत्रणा तोकडी पडत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मनपाच्या चार जलकुंभांवरून टँकर भरले जातात. मात्र सकाळी साडेनऊ ते सायंकाळी सहा या वेळेतच टँकर दिले जात असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. यासंदर्भात मनपात पत्रकारांशी बोलताना आमदार प्रदीप जैस्वाल यांनी टँकरच्या वेळा आणि फेर्‍या वाढवण्याची सूचना उपमहापौर संजय जोशी यांना केली. उपमहापौर म्हणाले की, नागरिकांच्या तक्रारी ध्यानात घेऊन टँकर पुरवठय़ाचे नियोजन करण्याचा प्रयत्न केला जाईल. टँकर वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी येत असल्याचे त्यांनी मान्य केले. टँकरवरून वादावादी होण्याचे प्रकार वाढले असून मागील काही दिवसांत तशा घटना घडल्या आहेत. आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या भावाने टँकरचालकाला मारहाण केल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला होता. मंगळवारी रात्री असाच प्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात घडला. तेथील जलकुंभावर तोडफोडीचा प्रकार घडला. टँकर पाठवण्यास उशीर का झाला, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अशोक बेहडे आणि इतरांनी जलकुंभावरील केबिनची तोडफोड केली व तेथील लाइनमन मोरे यांना मारहाण केली. या संदर्भात विचारणा केली असता ‘आपण तेथे नव्हतो’ असे बेहडे म्हणाले. हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले होते, पण तक्रार दाखल करण्यात आली नाही.