आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषद : कपाट घोटाळ्यानंतर आता टँकर घोटाळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हा परिषदेतील सत्ताधाऱ्यांचा कार्यकाळ काही महिन्यांतच संपणार आहे. या पाच वर्षांत विविध घोटाळे समोर आले. स्थायी समितीच्या सभेत मंगळवारी कपाट घोटाळ्यानंतर टँकर घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात अाला. घोटाळ्यांची ही मालिका सुरू असताना अधिकारी पदाधिकाऱ्यांमधील विसंवाद वारंवार समोर आला. अंमलबजावणी यंत्रणा असलेल्या गटविकास अधिकारी स्तरावरून हलगर्जीपणा होत असल्याने घोटाळ्यात भर पडत आहे.

स्थायीची अपूर्ण सभा पूर्ण करण्यासाठी अध्यक्ष मंजूषा गुंड यांनी मंगळवारी सभा बोलावली होती. कपाट घोटाळ्यावरून सभेत वादळी चर्चा झाली. यावेळी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, सभापती बाबासाहेब दिघे, शरद नवले, मीरा चकोर, नंदा वारे आदी उपस्थित होते. कपाट घोटाळ्यात चाैकशी समितीने विभागप्रमुखांसह इतर अधिकाऱ्यांचे खुलासे घेतलेले नाहीत. कारवाईचा अहवाल सादर झाल्यानंतर स्थायीसमोर ठेवता परस्पर आयुक्तांकडे पाठवण्यात आल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे.

मागील सभेत कार्यकारी अभियंता सुरेंद्रकुमार कदम यांच्याकडे टँकरसंदर्भात माहिती मागितली होती. त्यांनी माहिती दिल्याने यामध्ये घोटाळा असल्याचा आरोप सदस्यांनी केला. कपाट घोटाळ्यानंतर आता नव्याने टँकर घोटाळ्याचा आरोप झाल्याने सदस्य बाळासाहेब हराळ, राजेंद्र फाळके, सुजित झावरे, विठ्ठल लंघे यांच्यासह इतर सदस्यांनी सभात्याग केला. त्यानंतर तासभर अध्यक्ष गुंड यांच्या दालनात स्थायी समितीच्या पदाधिकारी सदस्यांची बैठक झाली. अधिकारी लोकप्रतिनिधींचे ऐकत नाहीत, परस्पर कारभार सुरू असल्याचा आरोपही सदस्यांनी यावेळी बोलताना केला.

सभेनंतर पत्रकारांशी बोलताना पदाधिकाऱ्यांनी टँकर घोटाळ्यासंदर्भात माहिती दिली. जीपीएसच्या माहितीत असलेली खाडाखोड संशयास्पद आहे. या प्रकाराची चाैकशी करा; अन्यथा आक्रमक भूमिका घेतली जाईल, असे ते म्हणाले. कार्यालयात अनेक फायली प्रलंबित असल्याच्या कारणावरूनही सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

जिल्हा परिषदेत आतापर्यंत विविध घोटाळे समोर आले आहेत. त्याबरोबर अधिकारी, पदाधिकारी, सदस्य यांच्यातील विसंवादही चव्हाट्यावर आला आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेने आपले प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींना निवडून दिले. पण घोटाळ्यांची मालिकाच सुरू असल्याने आता नाराजी व्यक्त होत आहे. पुढील काही महिन्यांतच निवडणुकांना सामोरे जायचे आहे. अशा परिस्थितीत घोटाळ्यांची माळ लांबत चालल्याने मतपेटीतून दणका बसण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.

टँकर घोटाळ्याची चौकशी होणार
दुष्काळी परिस्थितीत टँकरने पाणीपुरवठा करताना टँकरचे लॉक बुक, जीपीएस याची माहिती संकलित करण्यात येणार आहे. यासंदर्भात समिती स्थापन करून चौकशीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी १४ तालुक्यांतून जीपीएसचे रेकॉर्ड मागवण्याचे आदेश कार्यकारी अभियंता सुरेंद्रकुमार कदम यांनी कर्मचाऱ्यांना दिले.

गप्प बसणार नाही
अपूर्ण खेपा पूर्ण झाल्याचे दाखवले. जीपीएस प्रणालीतही अदलाबदल करण्यात आली. यंदाचा हा मोठा टँकर घोटाळा आहे. या प्रकरणी चौकशी होऊन कारवाई झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही.’’ मंजूषागुंड, अध्यक्ष, जिल्हा परिषद.

पाच वर्षांतील घोटाळे
जिल्हा परिषदेतील ७८ शिक्षकांनी बनावट अपंग प्रमाणपत्र सादर केले होते. केडगाव शाळाखोली दुरुस्ती घोटाळा, रोजगार हमी योजना (रोपवाटिका) घोटाळा, पुस्तक खरेदी घोटाळा कपाट घोटाळा उघडकीस आल्यानंतर आता टँकर घोटाळ्याचा आरोप झाला आहे, अशी कोट्यवधींची अनियमितता कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.

अधिकारी पदाधिकारी वाद
कपाट घाेटाळ्यावरून खुलासे घेता कारवाई प्रस्तावित केली जाते, याला स्थायी समितीत विरोध झाला. त्यावर अधिकाऱ्यांनी ही प्रशासकीय बाब असल्याचे स्पष्ट करून खुलासे बंधनकारक नसल्याची भूमिका मांडली. त्यामुळे संतप्त सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत, सभेतून काढता पाय घेतला. त्यामुळे हा वाद आणखी चिघळणार आहे.

नेमका प्रकार काय?
टँकरच्या मंजूर खेपांच्या तुलनेत कमी खेपा होत असल्याच्या नोंदी आहेत. परंतु खेपा किती झाल्या याचा विचार करता मंजूर खेपांप्रमाणे बिले काढण्याचा प्रयत्न केला गेला. लॉक बुक सोयीने भरले, तरी जीपीएसच्या नोंदी जेथे टँकर पोहोचले तेथील नागरिकांकडून लेखी घेतल्या नसल्याची चर्चा आहे.
बातम्या आणखी आहेत...