आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड, जालन्यापेक्षा टँकर अडीच पट महाग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - बीड आणि जालना शहराच्या तुलनेत औरंगाबादमध्ये जास्त प्रमाणात आणि खर्चात टँकर देण्यात येत असल्याचा शेरा मनपा आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मारला होता. त्याबाबत अधिक माहिती घेतली असता बीडमध्ये ३०० रुपयांत, जालन्यात ५०० रुपयांत खासगी, तर औरंगाबाद शहरात मनपाचे टँकर ७५० रुपयांमध्ये मिळत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

नागरिकांची मूलभूत गरज असलेल्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी पाणीपट्टी आकारण्यात येते. मात्र, टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी बीड आणि जालना नगरपालिका एक रुपयाही आकारत नाहीत. औरंगाबाद शहरातील नागरिकांना मात्र त्यासाठी मोठा खर्च करावा लागत असल्याचे समाेर आले आहे. पाणीपुरवठ्याबाबत आयुक्तांनी समांतरसह मनपा अधिकाऱ्यांची दोन दिवसांपूर्वी संयुक्त बैठक घेतली होती. यात टँकरची माहिती घेऊन त्याच्या खर्चाचाही आढावा घेतला होता. त्यांच्या किमतीबद्दल केंद्रेकरांनी आश्चर्य व्यक्त केले होते. बीडमध्ये पाच हजार लिटरसाठी केवळ ३०० रुपये मोजावे लागतात. टँकरचे पैसे नगरपालिकेच्या वतीने देण्यात येतात. नागरिकांवर त्याचा बोजा टाकला जात नाही. तसेच खासगी टँकरसाठी सहाशे रुपये मोजावे लागतात. हा खर्च मात्र नागरिकांकडून देण्यात येतो. जालन्यात तीन हजार लिटरच्या खासगी टँकरसाठी पाचशे रुपये द्यावे लागतात. येथे दोन वर्षांपासून नगरपालिकेची पाणी योजना असल्याने एकही टँकर लावावे लागले नाही. याउलट औरंगाबाद शहराची अवस्था असून नागरिकांना मनपाकडून टँकर घ्यायचे असल्यास त्यासाठी चक्क ७५० रुपये मोजावे लागतात. तसेच खासगी टँकरसाठी ६०० रुपये ते ७०० रुपये मोजावे लागत असल्याचे समोर आले आहे.

जालन्यातील पाणी योजना अगाेदर पूर्ण
जालन्याला २०१२ पासून जायकवाडीतून पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे येथे टँकरची गरज पडत नाही. ही योजना समांतरच्या नंतर सुरू होऊन पाणीही वितरित करत आहे. २००७ ला या योजनेचे काम सुरू झाले. जालना ते जायकवाडीपर्यंतच्या ९० किमीच्या प्रत्यक्ष कामाला २००९ मध्ये प्रारंभ होऊन २०१२ मध्ये शहराला पाणी मिळाले. त्यासाठी २९० कोटी रुपये खर्च आला. याउलट समांतर योजना २००६ मध्ये सुरू झाली. प्रत्यक्ष कामाला सप्टेंबर २०१५ मध्ये प्रारंभ झाला आणि कामही बंद पडले. त्याची लांबी केवळ ५० किमी असून खर्च मात्र १२०० कोटी आहे.

प्रक्रिया करता खासगी टँकर : मनपाअथवा समांतरकडून येणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करण्यात येते. मात्र, खासगी टँकरवाल्यांकडून कोणत्याही ठिकाणाहून कोणतीही प्रक्रिया करता पाण्याचे टँकर नागरिकांना पुरवण्यात येतात.

दररोज ५२० टँकर फेऱ्यांनी पाणीपुरवठा : शहरातील१०० पेक्षा जास्त असलेल्या गुंठेवारी भागातील नागरिकांना समांतरच्या वतीने दररोज ५२० टँकर फेऱ्यांनी पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यासाठी लागणारा खर्च नागरिकांना द्यावा लागतो.

बातम्या आणखी आहेत...