आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता दर 2 महिन्यांनी पाणीपट्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर समांतर जलवाहिनीला हिरवा कंदील मिळाला असून वाढीव खर्चाचा भुर्दंड नागरिकांवर पडू न देण्याची खबरदारी सध्या तरी घेण्यात आली आहे. एक सप्टेंबर रोजी मनपाची सध्याची पाणी योजना हस्तांतरित होणार असून औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनी दर दोन महिन्यांनी बिले देणार आहे. नोव्हेंबर महिन्यात औरंगाबादकरांना पहिले बिल प्रचलित दरानेच (वर्षाला 2700 रुपये) मिळणार आहे.

2006 पासून सुरूअसलेले समांतरचे गुºहाळ एकदाचे संपले आणि आज या योजनेच्या कामाचा मार्ग मोकळा झाला. येत्या तीन वर्षांत पूर्ण होऊन नंतरच औरंगाबादकरांचे चोवीस तास पाण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे. त्यासाठी 1 सप्टेंबरपासूनच औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनी शहरातील पाणीपुरवठा योजनेचा संपूर्ण ताबा घेणार आहे. पाणीपुरवठा विभागातील अभियंते वगळता 300 कर्मचारी (मुख्यत: लाइनमन) कंपनीकडे वर्ग करण्यात येतील. ते सध्या करत असलेलीच कामे करतील. याशिवाय कंपनीचे 200 कर्मचारी असतील. एकुणात 500 जण पुढील 20 वर्षे पाणी योजना सांभाळणार आहेत. 1 सप्टेंबरपासून समांतरचे ‘मीटर’ पडणार असले, तरी प्रत्यक्ष कामाला किमान 3 ते 6 महिन्यांनी प्रारंभ होणार आहे. 792 कोटींच्या या योजनेमुळे औरंगाबादकरांना येत्या काही महिन्यांत काय फरक पडणार आहे, याची माहिती ‘दिव्य मराठी’ने जाणून घेतली. त्यानुसार समांतरचे परिणाम येत्या नोव्हेंबर महिन्यापासून नागरिकांना पाहायला मिळणार आहे.

कर्मचारी हस्तांतरण
सध्याची पाणीपुरवठा यंत्रणा सांभाळत नव्या योजनेचे काम करणे अशा दोन पातळ्यांवर कंपनी काम करणार आहे. एक सप्टेंबरला हस्तांतरण झाल्यावर मनपाचे लाइनमन, पंपमन आणि इतर असे 300 कर्मचारी कंपनीकडे वर्ग केले जातील. त्यांचे पगार यापुढे कंपनी देईल. जलवाहिनीची गळती दुरुस्तीही कंपनीच करणार आहे.

200 कोटींचा निर्णय नाहीच
विलंबामुळे या प्रकल्पाची किंमत 200 कोटी रुपयांनी वाढल्याचा दावा करत कंपनीने ही रक्कम मनपाकडूनच मिळावी, योजनेचा कालावधी 23 वर्षे करावा, असा हट्ट धरला होता. तो मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळेंसह महापौर कला ओझा व पदाधिका-यांनी फेटाळला. राज्य सरकारकडून वाढीव रक्कम मिळवून देण्यात कंपनीला मदत करण्याची हमी मनपाने दिली. सरकारकडून 200 कोटी मिळाले नाहीत, तर पर्यायी योजना काय, या प्रश्नावर उत्तर देणे कंपनीने टाळले.

पाणीपट्टी
औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीचे उपाध्यक्ष जी. एस. बसू म्हणाले की, आम्ही दर दोन महिन्यांनी पाणीपट्टी वसूल करणार आहोत. पहिले बिल नोव्हेंबर महिन्यात दिले जाणार आहे. सध्या मनपा आकारत असलेल्या दराचेच हे बिल असणार असून नवीन दर कधीपासून लावायचे याचा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे.

भुर्दंड नाही
समांतरला अंतिम मंजुरी देताना 200 कोटींच्या खर्च वाढीचा कोणताही भुर्दंड मनपा किंवा औरंगाबादकरांवर पडणार नाही, अशी लेखी हमी औरंगाबाद युटिलिटी कंपनीतर्फे घेण्यात आली आहे, असे आयुक्त डॉ. कांबळे यांनी सांगितले