आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रातही शुद्ध पाण्याची ‘अमृतधारा’, अर्ध्या किमतीत थंडगार शुद्ध पाणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - बाटलीबंद मिनरल वॉटरमुळे होणारी पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी दोन तरुणांनी अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. त्यांनी जागोजागी शुद्ध पाण्याच्या आरओ प्लँट असलेल्या व्हेंडिंग मशीन्स बसवल्या. यात दोन रुपयांचे नाणे टाकताच ग्लासभर थंडगार शुद्ध पाणी मिळते.
यामुळे प्रदूषण आणि पाण्याची नासाडी टाळणे शक्य तर झालेच; पण अर्ध्या किमतीतच शुद्ध पाणीही मिळू लागले आहेे. तामिळनाडूतल्या विल्लुपरम जिल्ह्यातील औरोविले गावातले दोन मित्र मीन अमीन आणि अक्षय रोंगटा यांनी बाटलीबंद पाण्याला हा पर्याय दिला आहे. त्याचेच नाव अमृतधारा. या मशीन बसवण्यासाठी चाचपणी करण्याकरिता ते नुकतेच औरंगाबादेत येऊन गेले.
अशी सुचली कल्पना
फायनान्स क्षेत्रात कार्यरत अमीनने दोन वर्षांपूर्वी रेल्वे प्रवासात पाण्याची बाटली घेतली. अनेक प्रवाशांनीही बाटल्या घेतल्या. काहींनी तेथेच टाकल्या, काहींनी स्टेशनवर फेकल्या. तेव्हाच प्रदूषणाचे गांभीर्य त्याच्या लक्षात आले. इंडस्ट्रियल डिझायनिंगमधील मित्र अक्षय रोंगटाकडे हा विषय मांडला. आठवडाभर डोके लढवून मार्च २०१३ मध्ये औरोविलेत त्यांनी हा उपक्रम सुरू केला.
अशी वाहिली ‘अमृतधारा’
सुरुवातीला त्यांनी कॅन, माठामध्ये पाणी भरून ते एक रुपया प्रतिग्लासाप्रमाणे विकण्यास सुरुवात केली; परंतु पाण्याच्या शुद्धतेबाबत साशंकता असल्यामुळे बाटलीबंद पाणी घेणारे लोक त्यांच्याकडे येत नव्हते. हे पाणी थंड नसायचे, पण यामुळे लोकांना बाटलीबंद पाण्याला नेमका कसा पर्याय हवा आहे, हे लक्षात आले. याचे रीतसर फीडबॅक फॉर्म त्यांनी भरून घेतले होते. फेसबुक आणि इतर सोशल मीडियावरही त्यांनी कॅम्पेन चालवली.
दोन महिन्यांत 3 प्लँट
औरंगाबाद पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे. येथे मोठ्या प्रमाणात बाटलीबंद पाणी विकते. दुसरीकडे १५ रुपयांची बाटली विकत घेणे न परवडणारा मोठा वर्ग येथे आहे. सर्वकाही जुळून आले तर दोन महिन्यांत तीन प्लँट सुरू होतील, असे अमृतधाराचे सीएमडी मीन अमीन म्हणाले.

बाटल्यांविरोधात लढा
पाण्याच्या बाटल्या कित्येक वर्षे कुजत नाहीत. त्या जाळल्या तर वायुप्रदूषण होते. बाटल्यांचा धूर पावसासोबत जमिनीवर येतो. नदी, नाले व भूजल प्रदूषित करतो. आमचा लढा या बाटल्यांविरोधातच आहे, असे मत एमडी अक्षय रोंगटा यांनी मांडले.