आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सात महिन्यांत पाणचक्कीतून 24 कोटी लिटर पाण्याची नासाडी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - नहर -ए- पाणचक्कीतून दररोज 11.52 लाख लिटर पाणी वाया जात आहे. यंदा पावसाळ्यात विक्रमी पाऊस पडल्याने पाणचक्कीतून लगतच्या नाल्यातून अतोनात पाणी वाहून गेले. मागील सात महिन्यांत 24 कोटी 19 लाख लिटर पाण्याची नासाडी झाली आहे. नहर सर्वेक्षण समितीने महापालिकेला सादर केलेल्या अहवालाच्या आधारावर ‘दिव्य मराठी’ने 27 डिसेंबर 2013 पर्यंत वाहून गेलेल्या काढलेल्या पाण्याचा हिशेब काढला असता 24 कोटी 19 लाख 20 हजार लिटर पाणी वाया गेल्याचे उघड झाले.

दैनिक दिव्य मराठीने 2013 हे वर्ष जलवर्ष अभियान म्हणून घोषित केले होते. या अभियानाअंतर्गत ‘दिव्य मराठी’ने नहर-ए-अंबरी या चारशे वर्षे जुनी असलेल्या नहरीतून नागरिकांना पाण्याचा पुरवठा होत असल्याचे वृत्तमालिकेद्वारे निदर्शनास आणून दिले होते. या मालिकेची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नहर -ए -अंबरी आणि नहर -ए -पाणचक्कीचे संपूर्ण सर्वेक्षण करून अहवाल सादर करावा असा आदेश महानगरपालिकेला दिला होता. मनपाने तज्ज्ञांची नहर सर्वेक्षण समिती नियुक्त केली. या समितीने जून 2013 मध्ये पाणचक्कीचे अंतर्वाहय़ सर्वेक्षण केले. नहर-ए-अंबरीचे सर्वेक्षण समितीच्या वेळकाढूपणामुळे रखडले आहे.

दरम्यान, समितीने पाणचक्कीचा सर्वेक्षण अहवाल महापालिकेला सादर केला. पाणचक्कीचे पाणी कायमस्वरूपी साठवण्याची कोणतीही यंत्रणा नसल्याने येथील दररोज 11 लाख 52 हजार लिटर पाणी लगतच्या नाल्यातून वाहून जात असल्याचे निरीक्षण या अहवालात समितीने नोंदवले आहे.

मनपाचे सहकार्य नाही; जानेवारीत सर्वेक्षण
मनपाने वेळीच सहकार्य केले असते तर मेमध्येच दोन्ही नहरींचे सर्वेक्षण पूर्ण झाले असते. समितीने 78 दिवस व्यर्थ घालवले. त्यामुळे नहर ए अंबरीचे सर्वेक्षण लांबणीवर पडले. जानेवारी 2014 मध्ये सर्वेक्षण सुरू होईल. पाणचक्कीजवळच्या नाल्याजवळून कोट्यवधी लिटर पाणी सध्या वाया जात आहे. - डॉ. रमजान शेख, सदस्य, नहर सर्वेक्षण समिती.

दररोज 12 लाख लिटर पाणी मिळेल
जूनमध्ये नहर-ए-पाणचक्कीतून किती पाणी मिळू शकते यासाठी सर्वेक्षण केले. त्यामध्ये 15 सेकंदांत 200 लिटर, तर 24 तासांत 11 लाख 52 हजार लिटर पाणी वाया जात असल्याचे स्पष्ट झाले. एवढय़ा पाण्याचा संचय करण्यासाठी शासनाकडून 3 कोटी 20 लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून संपूर्ण पाण्याचा एका ठिकाणी साठा करून त्याचे शुद्धीकरण करण्यात येईल. यामुळे रोज 12 लाख लिटर पाणी मिळेल. प्रदीप देशपांडे, आर्किटेक्ट, नहर सर्वेक्षण समिती.