आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज पाणी उशिरा येणार, जायकवाडीत पुन्हा विजेचा दगा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पाणीपुरवठा बर्‍यापैकी सुरळीत होत असताना सायंकाळी जायकवाडीतील पंपहाऊसचा वीजपुरवठा खंडित झाल्याने उद्या शहरात होणार्‍या पाणीपुरवठय़ावर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे. शहराच्या अनेक भागांत उद्या मंगळवारी उशिरा पाणी येणार आहे.

गेल्या शुक्रवारपासून जायकवाडी व फारोळय़ात विजेचा सावळागोंधळ सुरू झाला आहे. त्यामुळे विस्कळीत झालेले पाण्याचे गणित बर्‍यापैकी नियंत्रणात यायला चार दिवस लागले. आज शहरातील बर्‍याच भागात पाणीपुरवठा सुरळीत झाला. हायसे वाटण्याआधीच पुन्हा विजेने दगा दिल्याने उद्या पाण्याची ओरड होणार आहे. सोमवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास जायकवाडीच्या पंपहाऊसजवळ विजेच्या तारांचे स्पार्किंग होऊन वीजपुरवठा बंद झाला. परिणामी जुन्या पंपहाऊसमधील तीन पंप बंद पडले. दुरुस्तीच्या कामासाठी दुसरी वाहिनीही बंद करण्यात आल्याने नव्या पंपहाऊसमधील पाचही पंप बंद करावे लागले. रात्री उशिरापर्यंत दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यानंतर पाणी उपसा होऊन त्याचा फारोळ्याला पुरवठा व शुद्धीकरणानंतर त्या पाण्याचा औरंगाबादपर्यंतचा प्रवास याला विलंब होत आहे. परिणामी शहरातील पाण्याच्या टाक्या निर्धारित वेळेपेक्षा उशिरा भरणार असल्याने मंगळवारी शहराच्या ज्या भागात पाणीपुरवठा होतो तेथे तो तीन ते चार तास विलंबाने होईल, असे मनपाने स्पष्ट केले आहे.