आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर शहरासाठी उजनीतून 5 मे नंतर पाणी सोडणार, जलसंपदा मंत्र्यांकडे बैठकीत निर्णय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शहरासाठी उजनी धरणासाठी पाच ते दहा मेदरम्यान पाणी सोडण्यात येणार आहे. अक्कलकोट तालुक्यातील हिळ्ळी आणि कोर्सेगाव बंधाऱ्यापर्यंत पाणी पोहोचावे, यासाठी नेहमीपेक्षा अर्धा टीएमसी पाणी जास्त सोडण्यात येणार आहे. एनटीपीसीची एक जलवाहिनी मनपास देण्याबाबत शासन पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्याबाबत तीन ते चार दिवसांत केंद्रीय ऊर्जामंत्री पीयुष गोयल निर्णय घेणार आहेत. नवीन जलवाहिनीसाठी १२४० कोटींच्या योजनेवर चर्चा झाल्याची माहिती पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिली. 

शहराला पाणीपुरवठा करणारा औज बंधारा कोरडा पडला आहे. टाकळी जॅकवेल येथे नऊ फूट पाणी आहे. उजनीतील पाणी नियोजनाबाबत चर्चा करण्यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे बैठक झाली. पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, आमदार भारत भालके, सिद्धाराम म्हेत्रे, नारायण पाटील, बबनराव शिंदे, मनपा सभागृह नेता सुरेश पाटील, स्थायी समिती सभापती संजय कोळी, जलसंपदा विभागाचे शिवाजी चौगुले, मनपा सार्वजनिक आरोग्य अभियंता मुकुंद भालेराव आदी उपस्थित होते. कोर्सेगावपर्यंत पाणी सोडावे, या मागणीसाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील अप्पाराव कोरे, अप्पाराव पाटील यांच्यासह सुमारे १० कार्यकर्ते मुंबईत होते. 

एनटीपीसी जलवाहिनी देण्याबाबत आठवड्यात निर्णय...
शहरासाठी बंद पाइपलाइनमधून पाणी घ्यावे, असे शासनाकडून वारंवार सांगितले जाते. त्यानुसार एनटीपीसीची एक जलवाहिनी मनपास देणे आणि त्याबदल्यात एनटीपीसीला शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून देणे यावर चर्चा झाली. केंद्रीय ऊर्जामंत्री पीयुष गोयल यांच्याशी चर्चा झाली. तीन ते चार दिवसांत याबाबत निर्णय देतो, असे गोयल यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना सांगितले. 

१२४० कोटींच्या योजनेवर चर्चा...
एनटीपीसीकडून सामाजिक दायित्व योजनेतून शहरासाठी २५० कोटी रुपये एनटीपीसीकडून मंजूर करण्यात आले. त्यासह १२४० कोटींची योजना तयार करून उजनी ते सोलापूर नवीन जलवाहिनी घालण्याबाबत चर्चा सुरू आहे. ही योजना मंजूर करण्यासाठी शासन पातळीवर बैठक घेण्याचे ठरले. 

महापालिकेकडून औज बंधारा येथे काम...
औज बंधारा शून्यावर गेल्याने तेथे साचलेले पाणी पोकलेनच्या सहाय्याने टाकळी येथील जॅकवेलपर्यंत आणण्यात येत आहे. त्यानुसार मंगळवारपासून काम करण्यास सुरुवात करण्यात आली. 

पोलिस बंदोबस्त लावू 
मागीलवेळी पाणी सोडणे लवकर बंद केल्याने चिंचपूर बंधारा पूर्णपणे भरला नव्हता. कर्नाटकातील बंधाऱ्यावर शेतकऱ्यांनी बर्गे टाकून पाणी अडवले. ते या वेळी होऊ नये म्हणून पोलिस बंदोबस्त ठेवून पाणी सोडण्यात येणार आहे. अर्धा टीएमसी पाणी जादा सोडले जाईल. सहा ते सात दिवसांत औज बंधाऱ्यात पाणी पोहोचेल. 

उजनीत दुबार पंपिंग करावे लागणार 
शहरासाठी उजनीतून पाणी सोडण्यास धरणात वजा २० टक्केपेक्षा कमी पाण्याची पातळी राहील. वजा २५ टक्के पाणी पातळी गेल्यास धरणात दुबार पंपिंग करावे लागणार आहे. आता उजनी धरणात एक टक्के पाणीसाठा आहे. 
बातम्या आणखी आहेत...