आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्ही सिंघम नाही, समाजाचे रक्षणकर्ते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पोलिस म्हणजे सिंघम अशी प्रतिमा बनली आहे. मात्र पोलिस म्हणजे नेमके काय याचा अनुभव घेण्यासाठी पोलिसांच्या जीवनात तुम्हाला डोकवावे लागेल. घरातला कर्ता माणूस समाजसेवेसाठी तब्बल १८ तास घराबाहेर असतो, तरीदेखील त्या कुटुंबाची काहीही तक्रार नसते. कायद्याचे रक्षण करणारा हा कर्मचारी कायद्यात राहून समाजाचेही रक्षण करतो.

पोलिसांची ही खरी प्रतिमा समाजासमोर पोहोचणे गरजेचे आहे, असे मत महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक संजीव दयाल यांनी व्यक्त केले. गुरुवारी एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात आयोजित "द डायरेक्टर जनरल्स यूथ पार्लमेंट चॅम्पियनशिप'च्या उद््घाटनप्रसंगी ते बोलत होते.
पोलिसांची प्रतिमा खऱ्या अर्थाने समाजासमोर पोहोचण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला असून तो राज्यभरात राबविण्यात येणार आहे. तरुण शक्तीला योग्य मार्ग मिळावा, त्यांना समाजातील समस्यांची जाणीव व्हावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे, असे दयाल यांनी सांगितले.

दयाल यांनी तरुणांना उद्देशून केलेले भाषण
या पिढीकडून खूप अपेक्षा आहे. आज या ठिकाणी येऊन खूप आनंद होत आहे. ही माझी जुनी कर्मभूमी आहे. मराठवाड्यात तीन वेळेस काम करण्याची संधी मिळाली. औरंगाबादमध्ये जो येतो तो या शहराच्या प्रेमात पडतो. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मला या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. भारतात निरनिराळ्या सभ्यता, सोळाशेपेक्षा अधिक भाषा, प्रत्येक भाषेचे वेगळे स्वरूप, जाती-जमाती, धर्म वेगवेगळे आहेत. त्यामुळे आपल्याकडील आव्हानेही मोठी आहेत. त्यांना सामोरे जात आपल्याला पुढे जायचे आहे. समाजातील तरुण यासाठी एकमेव पर्याय आहे. पुढील बारा वर्षापर्यंत आपला देश तरुण होत जाणार आहे. ही जबाबदारी ओळखून देशाला पुढे न्यायचे आहे. त्यासाठी हा उपक्रम आहे. जिल्ह्यातील बारा शाळांचा समावेश या उपक्रमात करण्यात आला आहे. युवा पिढीला या माध्यमातून प्रोत्साहन मिळू शकते. तरुण पिढीने समाजातील समस्यांवर विचार करावा हा आमचा प्रयत्न आहे. जर, तुम्ही शासनात असता तर या समस्या कशाप्रकारे हाताळल्या असता ही या कार्यक्रमाची मुख्य संकल्पना आहे. या अगोदर झालेल्या प्रयोगात नाथ व्हॅली आणि पोलिस पब्लिक स्कूल सहभागी झाले होते. यापुढे प्रत्येक तालुक्यात हा उपक्रम राबिवण्यात येईल. यातून तरुणांना प्रोत्साहन मिळेल. या पिढीकडून खूप अपेक्षा आहेत. स्वखुशीने विद्यार्थी आपले मत मांडण्यासाठी आले आहेत, याचा आनंद आहे. या शिवाय तरुणांसाठी पोलिस प्रशासनाकडून इंटर्नशिप प्रोग्राम राबविला जाणार आहे. यात पोलिस कसे काम करतात, पोलिस म्हणजे सिंघम आहे असे सगळ्यांना वाटते पण कायद्यात तसे नाही, आम्ही कसे जगतो याचा अनुभव तरुणांना घेता येईल. ज्या वेळेस आम्ही अठरा तास काम करतो तेव्हा आमच्या कुटुंबाच्या भावना काय असतात हेदेखील या तरुणांना जाणून घेता येईल. पोलिस कशाप्रकारे आव्हाने स्वीकारतात याचा अनुभव येईल. आम्हाला विश्वास आहे आम्ही यात यशस्वी होऊ. सीआयआयने या उपक्रमासाठी मदत केल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार.जय हिंद, जय महाराष्ट्र.
बातम्या आणखी आहेत...