आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वराज्याचे सुराज्य व्हावे असे आम्हाला का वाटत नाही?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘शोषितांच्या लाल लाल नद्या वाहत होत्या. कोमल बालकांची निरागस मुखकमलं त्या प्रवाहाचं सौंदर्य द्विगुणित करीत होती. सुदुब्रांच्या आणि चिनारांच्या डळमळत्या वृक्षांना लटकलेल्या शीलवंती अन् कुलवंती युवतीच्या अब्रूची लक्तरं, त्यांच्या रंगीबेरंगी वस्त्राच्या नि उपवस्त्राच्या लहरणार्‍या ध्वजा स्वातंत्र्याच्या महोत्सवाला शोभा आणीत होत्या’ एका महान देशभक्ताच्या जीवनावरील पुस्तकात एका मान्यवर लेखिकेने हे वर्णन केले ते देशाला स्वातंत्र्य मिळतानाच्या क्षणांचे. अमावास्येची काळीकुट्ट रात्र, 14 ऑगस्ट 1947 ची मध्यरात्र. स्वार्थांध नेत्यांनी त्या क्षणी मिळवलं अर्धवट स्वातंत्र्य. भारतमातेच्या शरीराचे तीन तुकडे झाले. हिंदुस्थानचे वीर बाहू तुटले. गुरुगोविंदसिंहांचा पंजाब आणि चैतन्यप्रभूंचा बंगाल आम्हाला परका झाला. हे सारे गमावून आम्ही केला जयघोष स्वातंत्र्याचा. या घटनेची पासष्टी उलटली तरी आज या चित्रात काही बदल झाला का? छे! जणू 14 ऑगस्टचा तो क्षण चिरंजीव झाला आहे. कालपुरुष तसाच थांबला आहे. त्या रात्रीचे फाळणीचे भेसुर अन् भयंकर दृश्य पाहून तो जे भयचकित झाला, थांबला तो अद्यापही तसाच आहे. अजूनही रक्ताचे सडेच शिंपले जात आहेत.

आम्ही ज्या भारतमातेचे पुत्र - ती भारतमाता कधी काळी म्हणत होती..
या लाडक्या मुलांनो, तुम्ही मला आधार ।
नव हिंदवी युगाचे, तुम्हीच शिल्पकार।।
पण या तिच्या आवाहनाला आम्ही प्रतिसाद दिला? छे! नव्या पिढीने जर असा प्रतिसाद दिला तर मग स्वार्थांध नेत्यांचे भविष्य अंधारात जाईल ना. म्हणून मग येथे रचले गेले नवे काव्य, ज्यात पराक्रमाची प्रेरणाच नाही. ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दुंगा’ म्हणणारे नेताजी पडद्याआड गेले.
हे मातृभूमी तुजला मन वाहियेले
वक्तृत्व वाग्विभवही तुज अर्पियेले।।
तुर्तेचि अर्पिली नव कविता रसाला
लेखाप्रति विषय तूंचि अनन्य झाला।।
असे म्हणणार्‍या धगधगत्या अग्निकुंडाचे नाव होते विनायक दामोदर सावरकर, ज्यांनी आपले घरदार मातृभूमीसाठी खर्ची टाकले. या सावरकरांना स्वातंत्र्यानंतरही आम्ही ब्रिटिशांपेक्षा अधिक छळले. वीणा दास, प्रीतिलता, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, अनंत कान्हेरे, शिरीषकुमार, बाबू गेणू यांना आम्ही विसरलो. सावरकरांप्रमाणेच सार्‍या घराने हौतात्म्य पत्करण्यात आनंद मानला होता त्या चाफेकर कुटुंबाची नोंद घ्यावी, असे आमच्या राज्यकर्त्यांना वाटले नाही.

दृष्टी राष्ट्राची हवी स्वार्थातही जी नेहमी,
उन्नती घे हमी ।
जो अहिंदी त्याजला ठेवा दुरी, चारा खडे,
भ्रांत तुम्हां कां पडे?
असे म्हणणारे माधव ज्युलियनही आम्हाला चालत नाहीत. देशाला स्वातंत्र्य मिळाले. पण खरेच मिळाले का? असे वाटावे, अशी वस्तुस्थिती आजही दिसते. त्यामुळे स्वातंत्र्य म्हणजे नेमके काय? ‘जेथे अपरात्रीसुद्धा एकटे फिरताना स्त्रियांना नि:संकोच निर्भय वाटत असतं त्या प्रदेशाचं नाव स्वराज्य! क्षुधा आणि शांती जिथं वेळेच्या वेळी प्राप्त होतात त्या प्रदेशाचं नाव स्वराज्य!’ असे वाक्य बाळ कोल्हटकरांनी आपल्या नाटकात कवी शिवराय भूषणांच्या तोंडी टाकले आहे.

धर्म, शांती, कला, काव्य आनंद यांच्या संपूर्ण विकासाला जेथे वाव आहे. त्याला म्हणायचं स्वातंत्र्य, असे विचार शरदचंद्र चट्टोपाध्याय यांच्या सव्यसाचीमध्ये आहेत. या पार्श्वभूमीवर विचार केला तर आजचे स्वातंत्र्य खरेच स्वातंत्र्य आहे का? जे हाती आले तेवढय़ावरच समाधान मानायचे का? स्वराज्याचे सुराज्य व्हावे असे आम्हाला का वाटत नाही? शेवटी लोकशाहीत आम्हीच तर कोणाला तरी नेता बनवतो, मंत्री बनवतो, राज्यसत्ता त्याच्या हाती देतो. पण शेवटी ‘राजा’ म्हणजे काय, तो कसा असायला हवा याचा विचार तरी आम्ही कोठे करतो?

‘रणदुंदुभी’ नाटकात वीर वामनराव जोशींनी तेजस्विनीच्या तोंडी फार सुंदर विचार दिलेत. ती म्हणते, ‘राजा हा स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी नेमलेला माणूस आहे. हाती आलेली राज्यसंपदा वाटेल तशी वाटेला लावण्याचा त्याला अधिकार नाही.’ आज शासनाच्या रिकाम्या होणार्‍या तिजोर्‍या आणि वाटाघाटीतून भूभागाचे होणारे आकुंचन हे पाहिल्यावर तर आजचे आमचे सत्ताधारी खरेच ‘राज्यकर्ते’ म्हणण्यास लायक आहेत का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची गरज आम्हाला वाटू नये का?
यज्ञी ज्यांनी देऊनि नीज शिर, घडिले मानवतेचे मंदिर
परि जयांच्या दहनभूमीवर नाही चिरा, नाही पणती
अशा स्थितीत आज राज्यकर्ते जागोजागी आपल्या नावाचे शिलालेख नोंदवत आहेत. इतकेच काय, या देशात जिवंतपणी नेत्यांचे अन् अभिनेत्यांचे पुतळे उभे केले जात आहेत. हे सारे कशामुळे ? आमचा देश वैभवशाली आहे म्हणून, आमचे राज्यकर्ते कर्तव्यतत्पर आहेत म्हणून? मंगल पांडे, झाशीची राणी, वासुदेव बळवंत यांच्यापासून ते अगदी अलीकडे लो. टिळक, म. गांधी, आगरकर, गोखले, म. फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सार्‍यांपर्यंत ज्यांनी ज्यांनी ब्रिटिशांविरुद्ध आपापल्या विचारांप्रमाणे कृती करून लढत दिली, संघर्ष केला, स्वत:चे आयुष्य पणाला लावले, त्या सार्‍यांच्या स्वप्नात कसे असेल असे वाटले होते स्वराज्य? हर्षद मेहता, तेलगी अशी आर्थिक गुन्हे करणारी, जक्कल-सुतारसारखी मानवी हत्या घडवणारी, मानवतसारखी अंधर्शद्धेने बालकांचे बळी घेणारी, रिंकू, शशिकला ओझा, वीणा देशमुख किंवा अगदी अलीकडचे दिल्लीत घडलेले बलात्कार प्रकरण.. उच्चशिक्षित युवतींचे आयुष्य भररस्त्यात संपवणारी, मतदारांचा विश्वासघात करून आलिशान बंगल्यात राहत वातानुकूलित गाडीतून प्रवास करणारी, आपल्या स्वत :च्या अन् पक्षाच्या स्वार्थासाठी देशातील चांगल्या योजनांना खीळ घालणारी, बाह्यशक्तीच्या पाठिंब्यावर या देशात हिंसाचार आणि अस्थिरतेचे बीज पेरणार्‍यांना पाठीशी घालणारी, सीमेवरील शहिदांच्या नातेवाइकांपेक्षा कितीतरी पटीने अधिक आर्थिक लाभ हरलेल्या खेळाडूला मिळेल अशी व्यवस्था करणारी अशी सारी अपप्रवृत्तीची बीजे ज्या भूमीत रुजताना, फुलताना अन् बहरताना दिसत आहेत, त्या प्रदेशाला का स्वराज्य म्हणायचे?
उष:काल होता होता काळरात्र झाली
अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली ।।
असे म्हणण्याची वेळ आलीय ती त्यामुळेच.