आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात महसूल मंडळात हवामान केंद्रे उभारणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - हवामानातील बदल, पर्जन्यमान, थंडी, तापमान, आर्द्रता, हवेचा वेग आदींची नोंद घेऊन हवामानाचा अचूक अंदाज वर्तविण्यासाठी आगामी मान्सूनपूर्व राज्यातील हजार ६५ महसूल मंडळात अद्ययावत स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी ४२१ मराठवाड्यातील महसूल मंडळांचा समावेश आहे.
ग्लोबल वॉर्मिंग, वनाच्छादित क्षेत्रांचा अभाव असल्याने हवामानात अनपेक्षित वेगाने बदल होत आहेत. पावसाळ्यातील अनिश्चित पर्जन्यमानाचे प्रमाण वाढले आहे. त्याची शेतकऱ्यांना अगोदर माहिती मिळत नाही. तसेच मान्सूनमध्ये काही वेळेतच धो-धो पाऊस पडून जातो. त्यानंतर तीन ते चार आठवड्यांचा मोठा खंड पडतो. काही ठिकाणी मुसळधार तर हाकेच्या अंतरावर थेंबही पडत नाही. यंदाही यापेक्षा वेगळी परिस्थिती नव्हती. याची जेव्हाच्या तेव्हा सत्य परिस्थितीची नोंद घेतली जात नाही.

कृषी विभाग, महसूल विभाग, विभागीय आयुक्त कार्यालयाकडून आज पडलेल्या पावसाची आकडेवारी दुसऱ्या दिवशी ऑनलाइन जाहीर केली जाते, तर तापमान, थंडी, बाष्पीभवन, हवेचा वेग आदींची माहिती दिली जात नाही. भविष्यातील हवामान कसे राहणार, महसूल मंडळात काय स्थिती राहील या विषयी शेतकऱ्यांना माहितीच दिली जात नाही. दुसरीकडे हवामानातील बदलानुसार पीक पद्धतीत बदल केल्यामुळे शेती तोट्यात चालली आहे. यामध्ये बदल करणे वातावरणातील घटकांची अचूक नोंद घेऊन बिनचूक अंदाज वर्तविण्यासाठी सरकारने राज्यातील २०६५ महसूल मंडळात अत्याधुनिक स्वयंचलित हवामान केंद्रे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी नागपूर अधिवेशनात मंजुरी मिळाली असून १०७ कोटींच्या वर तरतूद रण्यात आली आहे. मान्सूनपूर्व सर्व हवामान केंद्रे बसवून ती कार्यन्वित करण्यासाठी निविदाही काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती राज्य कृषी विभागातील सांख्यिकी सहायक अधीक्षक एस. एस. सांडभोर यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

मराठवाड्यालाअधिक फायदेशीर ठरेल
मराठवाड्यात ४२१ महसूल मंडळे आहेत. उष्ण कटिबद्ध विभाग असल्याने हवामानात वेगाने बदल होतात. वनक्षेत्र केवळ ४.९ टक्केच उरले आहे. डोंगर पोखरले गेले असल्याने पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे. परिणामी पावसाच्या वितरणात कमालीची विषमता असते. याचे वास्तव टिपण्याकरिता उपाय सुचवण्यासाठी हवामान केंद्र उपयुक्त ठरेल, असे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहे. याविषयी शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी २४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कृषी प्रदर्शनात हवामान केंद्राचा डिस्प्ले ठेवला जाणार असून वातावरणातील घटक, पिक पद्धती आदींविषयी प्रात्यक्षिकाद्वारे तज्ज्ञ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार असल्याचे उद्योजक राम भोगले यांनी सांगितले. तसेच मंडळाबरोबरच गावा गावातही हवामान केंद्र उभारणेही आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
हा होईल फायदा
एका महसूल मंडळात २७ ते २८ गावांचा समावेश होतो. अत्याधुनिक स्वयंचलित हवामान केंद्राद्वारे या गावा गावातील पर्जन्यमान, तापमान, थंडी, आर्द्रता, बाष्प आदींची नोंद घेतली जाणार आहे. याचा अभ्यास करून वादळ वारे, पाऊस, गारपिटीचा अचूक अंदाज दोन ते चार दिवस आधी सर्वांपर्यंत पोहोचवणे शक्य होईल. उपाययोजना करून नुकसान कमी करण्यास उपयुक्त ठरेल. हवामानानुसार पिकांचे क्षेत्र वाढवणे, तापमान, थंडी, पाऊस याची सूक्ष्म नोंद घेतली जाणार असल्याने होणारे पिकांचे नुकसानीचा सत्य अंदाज कळेल. पीक विमा मिळण्यातील अडचणी दूर होतील. कीड रोग प्रादुर्भाव रोखून शेती उत्पादनात वाढ करण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. दुष्काळ आणि बदलते हवामान यांचे परिणाम कमी करण्यास मदत होईल. बेरोजगारांच्या हाताला कामही मिळणार आहे. लाखो हेक्टर शेतीचे हवामान बदलानुसार नियोजन करता येईल.
बातम्या आणखी आहेत...