आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीकएंड स्पेशल: शिका, खेळा आणि संस्कारक्षम व्हा..

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'आमची मुले दिवसभर टीव्हीसमोर बसून राहतात, मैदानी खेळांऐवजी कॉम्प्युटर गेम्समध्येच रमतात, बाहेर पडलेच तर लहानसहान क ारणांवरून भांडणे काढतात; आमचे ऐकतच नाहीत..शहरातील सर्वसामान्य पालकांच्या या तक्रारी.. त्या दूर करण्यासाठी तब्बल दोन दशकांपूर्वी गरवारे पॉलिएस्टर लिमिटेड कंपनीने व्यवस्था करून ठेवली आहे. कंपनीमार्फत चालवल्या जाणार्‍या गरवारे कम्युनिटी सेंटरमध्ये रोज दोन ते अडीच हजार मुले मैदानावर घाम गळेपर्यंत खेळतात, विविध कला शिकतात, अभ्यास करतात आणि संस्काराची शिदोरी घेऊन भविष्यासाठी तयार होतात. मुलांसोबतच महिलांनाही येथे आपल्या कलागुणांना चालना देण्यास भरपूर वाव मिळतो.'

वाढते शहरीकरण, लहान होत चाललेला घरांचा आकार आणि त्रिकोणी कुटुंब यामुळे मुले एकाकी पडताना दिसतात. आई-वडील ऑफिसमध्ये गेल्यावर टीव्ही आणि संगणक हेच त्यांचे मित्र होतात. घरात आजी-आजोबा नसल्यामुळे चिऊ- काऊच्या गोष्टी, रामायण, महाभारत आदी सांगणारे कोणीच उरत नाहीत. त्यात मोकळी मैदाने नसल्यामुळे मैदानी खेळ खेळता येत नाही आणि फ्लॅट संस्कृती असल्यामुळे अंगणही राहिले नाही.

असे उभे राहिले कम्युनिटी सेंटर
भविष्यातील या संभाव्य अडचणी लक्षात घेऊन 1993 मध्ये प्रसिद्ध उद्योजक शशिकांत गरवारे यांनी एका केंद्राची सुरुवात केली. प्रारंभी जळगाव रोडवरील रेणुका माता मंदिर परिसरात सुरू झालेल्या या केंद्रात मुलांसाठी विविध खेळ, गाणी, गोष्टी यासारखे उपक्रम राबवण्यात आले. नंतर जागा कमी पडू लागल्यामुळे महापालिकेच्या सिडको एन-7 मधील हॉलमध्ये अधिक मोठय़ा स्वरूपात ते सुरू करण्यात आले.

लोकाभिमुख समाजमंदिर
गरवारे कम्युनिटी सेंटर म्हणजे लोकाभिमुख समाजमंदिरच आहे. चिमुकल्यांसाठी बालवाडी, अभिरुची वर्ग, छंदवर्ग, कराटे, किक बॉक्सिंग, जिम्नॅस्टिक, अभ्यासिका, भरतनाट्यम, संगीत, गायन, इंग्रजी संभाषण कला, फन स्पोर्ट्स, अँबॅकस वर्ग, योगासने असे विविध वर्ग चालतात. छंदवर्गात सापशिडीपासून क्रिकेट, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, बुद्धिबळ, बॅडमिंटन, टेबल टेनिस, मल्लखांब यांच्यासह 146 प्रकारांचा समावेश आहे. महिलांसाठी शिवणकाम, पेंटिंग, पाककला, बचत गट हे उपक्रम चालतात.

वार्षिक कार्यक्रमांची मेजवानी
या नियमित उपक्रमांसोबत सेंटरतर्फे वार्षिक कार्यक्रम नियमितपणे घेतले जातात. वर्षाची सुरुवात बालआनंद मेळाव्याने होते. सामान्य ज्ञान स्पर्धा, सुरक्षा सप्ताह, चित्रकला स्पर्धा, सूर्यनमस्कार स्पर्धा, अंधर्शद्धा निर्मूलन कार्यक्रम, मुलींसाठी कुटुंब शिक्षण शिबिर, गुरुपौर्णिमा संगीत-नृत्य महोत्सव, वक्तृत्व स्पर्धा, हळदी-कुंकू व तिळगूळ समारंभ यासोबतच वार्षिक क्रीडा दिवस व वर्धापनदिन कार्यक्रमांची येथे वर्षभर रेलचेल असते. दोन महिन्यांच्या उन्हाळी प्रशिक्षण शिबिरात तब्बल 35 उपक्रम घेतले जातात.

जिल्ह्यातील पहिली अभ्यासिका
शहरातील लहान घरांमध्ये मुलांना अभ्यासासाठी पुरेशी जागा मिळत नाही. ही अडचण लक्षात घेऊन या सेंटरमध्ये 1994 मध्ये एक अभ्यासिका सुरू करण्यात आली. ही मराठवाड्यातील खासगी संस्थेने उभारलेली पहिली अभ्यासिका ठरली आहे. मुले आणि मुलींसाठी स्वतंत्र अभ्यासिका आहे. मुली सकाळी 5 ते रात्री 9 पर्यंत, तर मुले रात्री 1 वाजेपर्यंत येथे बसू शकतात.

आगळे वेगळे प्रशिक्षण
मुलांना केवळ पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा व्यावहारिक ज्ञान मिळायला हवे, यासाठी संचालक सुनील सुतवणे सातत्याने आगळे-वेगळे उपक्रम आखत असतात. उन्हाळ्याच्या सुटीत त्यांनी 8 ते 12 वयोगटातील मुलांना भाजी कशी घ्यायची, याची माहिती दिली. मुलांनी 50 रुपये आणि पिशवी आणली. त्यांना जाधवमंडीत नेण्यात आले. तेथे ज्याने कमी पैसे खचरून चांगली आणि जास्त भाजी घेतली, अशा मुलांना बक्षीस देण्यात आले. याशिवाय शालेय मुले सातत्याने चेक, डीडी, पासबुक असे शब्द ऐकतात. विविध परीक्षांचे शुल्क भरण्यासाठी त्यांना या सर्वांची गरजही पडते. त्यांची माहिती व्हावी म्हणून सेंटरतर्फे 35 मुलांना युनियन बँकेत नेऊन प्रत्यक्ष कामकाज दाखवण्यात आले. कम्युनिटी सेंटरचे एक उपकेंद्र वाळूज येथे आहे. अविनाश क ॉलनीत ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने हे केंद्र चालवले जाते. वाळूज केंद्रात सर्वच प्रशिक्षण मोफत आहे. मिथीन चव्हाण या केंद्राचे प्रमुख आहेत.

ही आहे टीम गरवारे
सुनील सुतवणे (डीजीएम, गरवारे पॉलिएस्टर, संचालक), मिथीन चव्हाण (वाळूज सेंटर प्रमुख), रमाकांत रौतल्ले (प्रशिक्षक ) व शिल्पा कुलकर्णी (छंदवर्ग) हे पूर्णवेळ कार्यरत आहेत. तसेच त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञ प्रशिक्षण देतात. यात राहुल तांदळे (जिम्नॅस्टिक), सुरेश मिरकर (कराटे), संगीत (पं. सुधीर बहीरगावकर), भरतनाट्यम (विक्रांत वायकोस), योगासने (छाया मिरकर), अँबॅकस (सारिका जोशी), बालवाडी (आरती भाले), महिला विभाग (सुलभा जोशी), तर वाचनालय (सुरेश कुलकर्णी).

ग्रंथालयात साडेचार हजार पुस्तके
केवळ 20 रुपये महिन्याप्रमाणे येथे ग्रंथालय चालवले जाते. यात साडेचार हजारांच्या वर पुस्तके आहेत. शिवाय 150 दिवाळी अंकांचा खजिनाही उपलब्ध असतो. यासोबतच लोकसेवा आयोग, आयआयटी, वैद्यकीय आणि अन्य प्रवेश आणि स्पर्धा परीक्षांची पुस्तकेही येथे आहेत. परिसरातील सर्वसामान्य मध्यमवर्गीयांना डोळ्यासमोर ठेवून येथे शुल्क आकारले जाते. किमान शुल्क 20 रुपये महिना आहे. अभ्यासिका, ग्रंथालय आणि छंदवर्गासाठी 200 रुपये वार्षिक शुल्क घेतले जाते. म्हणजेच महिन्याला 20 रुपयांपेक्षाही ते कमी पडते. अँबॅकसच्या एका लेव्हलसाठी किटसहित अकराशे रुपये आकारले जातात.

रोज 2 हजार चिमुकल्यांचा सहभाग
येथे रोज 2 हजारांच्या वर चिमुकले विविध प्रशिक्षणात सहभागी होतात. जिम्नॅस्टिकमध्ये 400, अभ्यासिकेत 700, कराटेमध्ये 200, छंदवर्ग 100, तर इतर सर्व प्रकार, असे मिळून 2 हजार मुलांची येथे नेहमीच वर्दळ असते. त्यांना अडचण होऊ नये, गर्दी वाढून अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्यांचे वेगवेगळ्या बॅचेसमध्ये विभाजन करण्याचे कसब सेंटर व्यवस्थापनाला पार पाडावे लागते. यामुळेच आतापर्यंत येथे कधीच कोणताही अपघात, भांडणे होत नाहीत.

राष्ट्रीय बालभवनशी संलग्नता
2010 मध्ये या सेंटरला केंद्र सरकारच्या राष्ट्रीय बालभवनची संलग्नता प्राप्त झाली. मुलांमधील विविध कलागुणांना चालना देण्यासाठी बालभवन कार्य करते. त्यासाठी केंद्र शासन बालर्शी पुरस्कार प्रदान करत असते. गरवारे कम्युनिटी सेंटरचे स्पर्धक या स्पर्धांसाठी यंदा दाखल झाले आहेत. पहिल्याच वर्षी सेंटरला केंद्र सरकारचा नैतिक मूल्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. देशभरातील 157 बाल भवनातून या सेंटरची या पुरस्कारासाठी निवड झाली होती.