आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागणरायाचे आगमन झाले आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. कुठे दीड दिवसांचा तर कुठे पाच आणि बहुतेक सार्वजनिक मंडळांच्या गणपतीसह घरा-घरातील गणपतींचे बुधवारी उत्साह आणि जल्लोषात मिरवणूकीने विसर्जन झाले. पुण्यातील गणेशोत्सवाचा रंगच निराळा. बुधवारी सकाळी सुरु झालेली विसर्जन मिरवणूक गुरुवारी दुपारनंतर संपली. मुंबईसह महाराष्ट्रातील इतरही ठिकाणी हाच उत्साह पाहायला मिळाला. कोल्हापूरमध्ये मात्र, विसर्जन मिरवणूकीला दगडफेकीचे गालबोट लागले. महिला पोलिसांच्या विनयभंगापर्यंत हा प्रकार गेला. या प्रकरणी आमदारांसह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंबईत विसर्जन मिरवणूकीतील गर्दीचा गैरफायदा घेत काही तरुणांनी महिला आणि मुलींचा विनयभंग केला.
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला एक महिना लोटला आहे मात्र, त्यांच्या मारेक-यांचा तपास लागलेला नाही. राज्याच्या गृह खात्याच्या आणि राज्य शासनाच्या निषेधार्थ पुण्यासह संपूर्ण राज्यात शुक्रवारी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. डॉ. दाभोलकरांची हत्या राज्यसरकार पुरस्कृत असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आणि खळबळ उडवून दिली आहे. त्यानंतर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.
एकीकडे डॉ. दाभोलकरांच्या हल्लेखोरांचा तपास पोलिसांना लागत नाही आणि दुसरीकडे मुंबईत कोर्टातून भरदिवसा दहशतवाद्याने पोलिसांच्या हातावर तुरी दिल्या आहेत. यामुळे मुंबई पोलिसांची नाचक्की झाली आहे. मुंबईच्या शक्ती मिलमध्ये वृत्तछायाचित्रकार तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी पोलिसांनी 600 पानी आरोपपत्र दाखल केले असून या प्रकरणाची सुनावणी 23 सप्टेंबर पासून सुरु होणार आहे.
भ्रष्टाचाराने महाराष्ट्रासह देश पोखरत चालला असल्याची उदाहरणे रोजच समोर येत आहेत. औरंगाबादमध्ये कंत्राटदाराकडून 50 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेला सार्वजनिक बांधकाम खात्याचा कार्यकारी अभियंता गजानन खाडे याच्या घरात आतापर्यंत दहा कोटींचे घबाड हाती लागले आहे.
यासह गेल्या आठवड्यातील महत्त्वाच्या घडामोडी पुढील स्लाइडमध्ये.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.