आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला पथकांचे खास आकर्षण आणि सळसळत्या उत्साहात गणरायाचे आगमन...!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सकल कलांचा अधिपती गणरायांचे शुक्रवारी आगमन झाले. जल्लोष वाढवणारा ढोल-ताशांचा निनाद.. मधुर सुरावटींनी आकर्षित करणारे बँडपथकांचे बहारदार वादन.. ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर.. कार्यकर्ते आणि ढोल-ताशा पथकातील युवक-युवतींत संचारलेला सळसळता उत्साह.. ठिकठिकाणी छोटेखानी मिरवणुका.. विधिवत पूजेने होणारी प्रतिष्ठापना आणि सामूहिक स्वरात श्रीगणेशाची आरती असे प्रसन्न करणारे वातावरण शुक्रवारी औरंगाबादकरांनी अनुभवले. 

- २२००० घरांमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती 
- २५ टक्के पीओपीच्या मूर्ती शिल्लक राहिल्या मातीच्या मूर्तींमुळे 

सळसळता उत्साह... 
मूर्तीखरेदीसाठी औरंगपुरा, टीव्ही सेंटर, एन-७, एन-४, जयभवानीनगर, जवाहर कॉलनी, मुकुंदवाडी, पुंडलिकनगर, छावणी, गजानन महाराज चाैक, पीरबाजार, रेल्वेस्टेशन, चिकलठाणा, वाळूज, पंढरपूर आदी भागांत रस्ते उत्साहाने फुलले होते. गणेशभक्तांच्या गर्दीने पाय ठेवायलाही जागा नव्हती. 

पर्यावरणस्नेहाकडे कल 
प्लास्टरऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारी पर्यावरणाची हानी आता लोकांच्याही लक्षात येऊ लागली आहे. त्यामुळे पर्यावरणस्नेही शाडू मातीच्या गणेशमूर्ती बसवण्याकडे नागरिकांचा कल वाढत चालला आहे. मोठी मागणी झाल्यामुळे सायंकाळीच शाडू मातीच्या मूर्ती संपल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. 

महिला पथके खास आकर्षण 
विघ्नहर्त्यागणेशाची मूर्ती नेण्यासाठी आलेली विविध गणेश मंडळांची ढोल-ताशा पथके आणि त्यांचे तालबद्ध वादन हे शुक्रवारचे खास आकर्षण ठरले. शहरभर या पथकांचाच बोलबाला होता. 
बातम्या आणखी आहेत...