औरंगाबाद- उन्हाळी सुटीनंतर उद्या (गुरुवार) पासून शाळांमध्ये पुन्हा विद्यर्थ्यांचा किलबिला ऐकायला येणार आहे. वर्गात काही नव्या, तर काही जुन्या मित्रांसोबत नवीन वर्गात बसण्याचा आणि मधल्या सुटीत डबा खाण्याचा आनंद पुन्हा शाळा शाळांमध्ये पाहण्यास मिळणार आहे. शाळेच्या पहिलाच दिवशी प्रवेशोत्सव देखील साजरा केला जातो. विद्यार्थ्यांमध्ये शाळेची गोडी निर्माण व्हावी, त्यांनी नियमित शाळेत यावे यासाठी गेल्या तीन वर्षापासून शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्याचे आदेश शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आले आहेत. यंदा देखील शाळांमध्ये असेच प्रवेशोत्सव रंगणार आहे.
शहरातील विनायकराव पाटील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची तयारी आगळ्या-वेगळ्या पद्धतीने करण्यात येत आहे. या शाळेत पहिल्याच दिवशी येणाऱ्या विद्यार्थ्याचा थाट हा एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणे असणार आहे. या शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत सनई चौघड्यांच्या मगल वाद्याने फेटे बांधून, औक्षण करुन आणि ग्रंथ भेट व गुलाबपुष्प देऊन करण्यात येणार आहे. एवढेच नाही, तर नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे रेड कार्पेट वरुन स्वागत केले जाणार आहे, अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहलता हिवर्डे यांनी दिली.