आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षराच्या प्रवेश अर्जावर पंकजा मुंडेंची स्वाक्षरी, पालिकेच्या शाळेत प्रवेशोत्सव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राज्यभरातील शाळांत बुधवारी प्रवेशोत्सवाबरोबरच कन्या प्रवेशोत्सवही झाला. शहरातील एका मुलीला ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत शाळेत प्रवेश देऊन प्रवेशोत्सव कन्या प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. सकाळी साडेनऊ वाजता गारखेडा परिसरातील महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेत अक्षरा विठ्ठल पवार या चिमुकलीचा प्रवेश अर्ज मुंडे यांनी स्वत: भरून मुख्याध्यापकाकडे सुपूर्द केला. घरातील मुलगी शिकली तर संपूर्ण समाज प्रगत होईल, असा आशावाद मुंडे यांनी या वेळी व्यक्त केला.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना मुंडे म्हणाल्या की, शाळा ही जीवनातील अतिशय सुंदर गोष्ट अाहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिकूनही मी प्रगती करू शकले. चांगली साधने मिळाली नाही म्हणून शिक्षणात पुढे जाता येत नाही असे नाही. महानगरपालिकेची असो वा जिल्हा परिषदेची शाळा, अभ्यास करून पुढे जाता येते. सर्वच विद्यार्थ्यांनी खूप अभ्यास करावा, खूप मोठे व्हावे, असा सल्लाही त्यांनी दिला. शासनाच्या 'कायापालट' या योजनेतून महानगरपालिकेच्या शाळांचा शैक्षणिक विकास साधता येईल, असेही त्या म्हणाल्या.

मनपा शाळांकडे लक्ष
महापौरत्र्यंबक तुपे यांनी मनपाच्या शाळांकडे जातीने लक्ष देऊन सुविधा वाढवण्यावर भर दिला जाईल, अशी ग्वाही दिली. शाळेत १५५ मुले-मुली उर्दू मराठीचे शिक्षण घेत असल्याचे मुख्याध्यापिका प्रतिभा कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात सांगितले. या वेळी उपमहापौर प्रमोद राठोड, महिला बालकल्याण सभापती अर्चना नीळकंठ, शिक्षण सभापती प्रेमलता दाभाडे, स्थायी समितीचे सभापती मोहन मेघावाले, नगरसेविका जयश्री कुलकर्णी, आयुक्त ओमप्रकाश बकाेरिया, अतिरिक्त आयुक्त रमेश पवार, उपायुक्त अयुब खान, डॉ. भागवत कराड, गजानन बारवाल, राजेंद्र जंजाळ, दिलीप थोरात, सुरेंद्र कुलकर्णी आदी उपस्थित होते. सहशिक्षिका दीपाली काथार यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी महापौरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.