आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येळगंगा नदीत सापडली विहीर; पाणीप्रश्न सुटणार, विधानसभा अध्यक्षांनी दिली भेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेरूळ - येळगंगा नदीच्या विकासासाठी झटणाऱ्या स्वयंसेवकांना नदीपात्राच्या रुंदीकरण आणि खोलीकरणादरम्यान पुरातन विहीर आढळली असून या विहिरीतील पाणी पूर्णपणे काढले, तरी विहीर पुन्हा पाण्याने काठोकाठ भरत असल्यामुळे पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

नदीपात्रात डोह बनवण्यात येत असताना लक्षविनायक मंदिराच्या भागात १० फूट खोल विहीर आढळली. या घटनेमुळे स्वयंसेवकांचा उत्साह दुणावला आहे. मराठवाड्याचे महाबळेश्वर अशी ख्याती असणाऱ्या महेशमाळ येथे उगम पावणाऱ्या येळगंगा नदीचे पात्र अतिक्रमणे, दुर्गंधीयुक्त पाणी आणि मोठमोठ्या झुडुपांमुळे जवळपास नामशेष झाले होते. मात्र, ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व लाभलेला हा वारसा जपण्यासाठी वेरूळमधील जागरूक नागरिकांनी विशेष अभियान सुरू केले.
या अभियानाबाबत सोशल मीडियावरून माहिती मिळताच मदतीचे अनेक हात पुढे आले आणि हे अभियान लोकचळवळ बनले आहे. नदीपात्राची स्वच्छता व्हावी, रुंदीकरणाचे काम सुरू व्हावे, यासाठी दै. ‘दिव्य मराठी’ने विशेष अभियान राबवत हा प्रश्न सातत्याने नागरिक आणि प्रशासनासमोर मांडला. या प्रयत्नांना यश येत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. अभिजित चौधरी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंकी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली १३ मार्चपासून रुंदीकरण, खोलीकरण मोहीम सुरू झाली. प्रशासनाची साथ मिळाल्यामुळे काम गतीने सुरू झाले अन् पाहता पाहता मदतीसाठी अनेकांनी हात पुढे केले. महाराष्ट्र बँकेने आर्थिक मदत केल्यानंतर मुंबईतील केअरिंग फ्रेंड्स या संस्थेनेही दीड लाखांचा निधी देऊ केला आहे.