आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Well Water, But Unable To Get Electricity Connection However Any Money Filling

विहिरीत पाणी आहे, मात्र पैसे भरून वीज कनेक्शन मिळेना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - विहिरीत पाणी आहे, मात्र वीज नाही. चार वर्षांपूर्वीच कोटेशन भरले आहे, मात्र अजूनही कनेक्शन मिळाले नाही. कारकीनमध्ये जलयुक्त शिवार योजनेच्या कामाची माहिती सांगताना दुष्काळी पथकाच्या समोर हे भयावह वास्तव आले. ग्रामीण भागातले हे वास्तव प्रशासकीय अनास्था किती आहे याची पोलखोल करणारे होते.

दुष्काळाची स्थिती दाखवताना जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत करण्यात आलेली कामेदेखील दाखवण्याचे ठरले होते. त्यानुसार जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत कारकीन, चौऱ्याहत्तर जळगाव आणि पाचोड या गावातली कामे दाखवण्यात आली. मात्र काम चांगले झालेले असले तरी पाणी नसल्यामुळे त्याचा फायदा शेतकऱ्यांना झालेला नाही.

ठिबकका केले नाहीस...
कारकीनमध्येपथकाने शेख रफी शेख सरदार या शेतकऱ्याच्या शेतात कंपार्टमेंट बंडिंग कामाची पाहणी केली. त्यामुळे विहिरीला पाणी वाढले होते. मात्र कपाशीला ठिबक का नाही केलेस, असा सवाल विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी शेतकऱ्याला केला. त्याने दिलेले उत्तर ऐकून पथक थक्क झाले. तो म्हणाला, वीज कनेक्शनच नाही. कोटेशन भरले का, विचारल्यावर २०११ मध्येच भरल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर दांगट यांनी या भागातली पाहणी करून माहिती देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर पथकाने चौऱ्याहत्तर जळगावमध्ये भानुदास नारळे यांच्या शेतीची पाहणी केली. या ठिकाणी सिमेंट नाला बंधारा बांधण्यात आला होता. पाणी साचल्यानंतर हे शेतकरी पाणी उचलून विहिरीत टाकतात. त्यामुळे त्यांचे मक्याचे पीक वाचले होते.

निवेदन दिले मात्र...
शेतकरी संघटनेच्या वतीने कारकीनमधल्या प्रश्नाबाबत सातत्याने महावितरणला निवेदन दिले. एकट्या कारकीनमध्ये शंभरपेक्षा अधिक शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे. मी कारकीनचाच रहिवासी असून मलादेखील आठ महिन्यांपेक्षा अधिक कालावधी होऊनही वीज मिळालेली नाही. शेखरशीद शेख महंमद, शहरप्रमुख, शेतकरी संघटना.

कर्जमाफी द्या...
रहाटगावलापथक पोहोचल्यानंतर शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी तसेच काही शेतकऱ्यांनी पथकाला निवेदन दिले. या वेळी शेतकऱ्यांनी कर्जमाफी द्यावी, अशी घोषणाबाजीदेखील केली. सूर्यवंशी म्हणाले की, शेतकऱ्यांची अवस्था भयाण आहे. दररोज शेतकरी आत्महत्या करत आहे. या वेळी आत्महत्या केलेल्या शेतकरी महिलेच्या मुलालादेखील त्यांनी सोबत आणले होते. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ एक लाख मदत दिली जाते. आत्महत्या केलेल्या कुटुंबावर चार लाखांचे कर्ज आहे. त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. मुलांना फीस भरायला पैसे नसल्यामुळे शिकवू शकत नाही, अशी अवस्था आहे. त्यामुळे एकरी दहा हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. तर काही शेतकऱ्यांनी जूनपासूनच कृत्रिम पाऊस पाडण्याची व्यवस्था उभी करा, अशी मागणीही केली.

पाचोडमध्ये पथकाला जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत गलाटी नदीच्या रुंदीकरण आणि खोलीकरणाचे काम दाखवण्यात आले. जवळपास दहा किमी नदीचे काम करण्यात येत आहे. मात्र पाऊस झाला नसल्यामुळे सध्या तरी या ठिकाणी पाणी साचले नव्हते. जिल्ह्यातला दुष्काळी दौरा संपल्यानंतर राघवेंद्र सिंग यांना दुष्काळाबाबत विचारले असता ते म्हणाले, आज पहिल्या टप्प्यातली पाहणी केली आहे. सर्व ठिकाणची परिस्थिती पाहणार आहे. शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे पहिल्यांदा पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे.