आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नद्यांचे पाणी वळवण्याच्या अहवालाचे काय झाले?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - कोकणातील नद्यांचे समुद्रात जाणारे पाणी वळवून मराठवाड्यात आणले पाहिजे, असे सांगत त्यासाठी लागणारा खर्च करण्यास सरकारला भाग पाडू, अशी भूमिका केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी घेतली आहे. मात्र, आता नगर, नाशिक आणि मराठवाड्यातील पाण्याच्या वादात शरद पवार मराठवाड्याला कात्रजचा घाट दाखवत असल्याचे मत जलतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. कोकणातील नद्यांचे सोडा, दहा वर्षांपूर्वी महाराष्ट्र पाणी परिषदेने नद्यांचे पाणी वळवण्याबाबतचा अहवाल दिला होता. त्या अहवालाचे काय झाले, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. सध्या मराठवाड्यात पाणीसंघर्ष सुरू आहे. त्यातच शरद पवारांनी मराठवाड्यासाठी कोकणातील नद्यांचे समुद्रात जाणारे पाणी वळवण्यासाठी सरकारला भाग पाडू, असे वक्तव्य केले. दहा वर्षांपूर्वी शरद पवार यांना महाराष्ट्र पाणी परिषदेने नद्यांचे पाणी वळवण्याबाबतचा अहवाल दिला होता.

या परिषदेचे अध्यक्ष आमदार गणपतराव देशमुख, तत्कालीन खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्यासह परिषदेचे सदस्य या. रा. जाधव, भुजंगराव कुलकर्णी, तत्कालीन वाल्मी संचालक जे. टी. जंगले, एस. बी. वराडे यांनी दिल्लीत पवारांना हा अहवाल दिला होता. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, मनोहर जोशी यांची भेट घेऊन त्यांनादेखील अहवालाची माहिती दिली होती. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

सर्वेक्षण झाले नाही
पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी जायकवाडीत वळवण्याबाबत गेल्या दहा वर्षांपासून फक्त चर्चा सुरू आहे. मात्र, हे पाणी वळवण्याबाबत अजून कोणतेही सर्वेक्षण सरकारकडून झालेले नाही. उत्तर कोकणातील नद्यांचे पाणी वळवून प्रवरामध्ये सोडून ते पाणी जायकवाडीमध्ये आणण्याची ही योजना आहे. या माध्यमातून जवळपास 155 टीएमसी पाणी जायकवाडीमध्ये येऊ शकते.