आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपखंड झपाट्याने सरकतोय उत्तरेकडे, तज्ज्ञ म्हणतात, जनजागृतीच उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नेपाळमध्ये झालेल्या भूकंपाचे हादरे भारतातही चांगलेच बसले, याचे रहस्य हिमालय पर्वताच्या निर्मितीत दडले आहे. लाखो वर्षांपासून होणारी ही भूगर्भीय हालचाल इतर भागांच्या मानाने अतिशय तीव्र आहे आणि हे वेळोवेळी शास्त्रज्ञांनी शेकडो शोधनिबंधांतून सांगितले आहे. हिमालयाचा भाग भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून शास्त्रज्ञंाच्या नोंदीत पक्का अधोरेखित केला आहे; पण याची नोंद फक्त शास्त्रज्ञांच्या शोधनिबंधांपुरतीच राहिली आहे.
फोटो - भूकंपामुळे उध्वस्त झालेला हिमालयातील बेस कॅम्प.
शनिवारी सकाळी ११.४० मिनिटांनी नेपाळमध्ये मोठा भूकंप झाला, त्याचे नोंद रिश्टर स्केलवर ७.९ इतकी झाली.तसेच भारतातील उत्तरेकडील सर्व राज्यांत याचे हादरे बसले. ६ रिश्टरची नोंद झाली. भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते कालावधीच्या बाबतीत आजपर्यंत जाणवलेला हा सर्वात मोठा भूकंप आहे. कारण आजवर ४० ते ५० सेकंदांचे भूकंप जाणवले आहेत; पण हा भूकंप जवळपास २ मिनिटे जाणवला आणि एकाच वेळी इतक्या मोठ्या भूभागामध्ये जाणवणारा हा सर्वात मोठा भूकंप ठरलाय.

हिमालयाच्या पायथ्याशी दडलेय काय...
भारतीय उपखंड कोट्यवधी वर्षांपासून उत्तरेकडे सरकतो आहे. तो आता चीन उपखंडाला धडकतो आहे. त्यामुळेच हिमालयाची निर्मिती झाली. यामुळे खडकांचे वलीकरण (फोल्ड) आणि भंजन (भेगा किंवा फॉल्ट) सुरू आहे. या भूगर्भीय हालचालींतून, कंपनांतून निर्माण होणारी ऊर्जा तेथेच साठवली जात आहे आणि ही प्रक्रिया सतत होत असल्याने क्षमतेपेक्षा जास्त ऊर्जा साचली की ती भूकंपीय लहरींद्वारे बाहेर पडत आहे. हिमालय पर्वतरांगांत नेपाळ असल्याने तेथे ही ऊर्जा मोठ्या प्रमाणात बाहेर पडली. हिमालयीन पर्वतरांग ही २८०० कि.मी.इतकी लांब आहे. ती पूर्व-पश्चिम पसरलेली असून हा भाग भूकंपप्रवण म्हणून भूगर्भशास्त्रज्ञांनी खूप आधी सांगून ठेवले आहे.

महाराष्ट्र अन् मराठवाड्यातही भूकंपप्रवण क्षेत्र...
महाराष्ट्रात काही भूकंपप्रवण क्षेत्रे आहेत. उदा. कोयना नदीचा भाग. मराठवाड्यात गोदावरीच्या पात्रातील लातूरकडील भाग (किल्लारी) व नांदेड शहर हा भाग भूकंपप्रवण क्षेत्रात येतो.अभ्यासकांच्या मते तेथील लोकांनाही शास्त्रीय माहिती देऊन सतत जागरूक केले पाहिजे. कारण नैसर्गिक आपत्ती सांगून येत नाही. नाही तर असेच भूकंप होत राहतील अन् आपल्याला फक्त मृत्यूंचा आकडा आणि झालेले नुकसान एवढेच मोजणे आपल्या हाती राहील.

भूकंपाचा अंदाज घेता येतो..
भूकंपप्रवण क्षेत्रातील भूकक्षीय हालचालींवर लक्ष ठेवून भूगर्भातील लहरींचे विश्लेषण सलग केले तर त्यांतील बदलांच्या अभ्यासावरून भूकंपाचा अंदाज व्यक्त करणे कठीण नाही. त्यासाठी लागणारी यंत्रणा आहे, पण तिचे परिणाम बाहेर येत नाहीत ही दुर्दैवाची बाब आहे.
प्रा. प्रफुल्ल शिंदे, भूशास्त्रज्ञ