आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कापसाला भाव नाही, डीपीची वीज नाही, आत्महत्या नाही तर काय करायचे?: शेतकऱ्यांचा कृषीमंत्र्यांना प्रश्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- कापसाला भाव नाही. बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे मोठे नुकसान झाले आहे. कृषी अधिकारी फिरकत नाहीत. यातच गावातील डीपीचा वीजपुरवठा तोडल्याने पिकांना पाणीही देता येत नाही. मग आम्ही आत्महत्या नाही तर काय करावे, असा उद्विग्न सवाल शनिवारी बाळापूरच्या शेतकऱ्यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना केला. तेव्हा संतापलेल्या खोत यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. कार्यालयातील खुर्च्या सोडून शेतात जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा, अन्यथा तुमच्यावर कडक कारवाई करीन, असा दम भरला.


जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीनंतर सदाभाऊ खोत यांनी बाळापूर गावाला भेट दिली. त्यांच्यासोबत जिल्हा कृषी अधीक्षक एस.जी. पडवळ, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी आनंद गंजेवार यांच्यासह कृषी विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ताराबाई खाडे यांच्या शेतात खोत यांनी भेट दिली. बोंडअळीमुळे कापसाचे मोठे नुकसान झाले. यंदा पन्नास टक्के कमी कापूस झाल्याचे त्यांचा मुलगा कृष्णा याने सांगितले. त्यावर खोत यांनी किती गावांत हा प्रादुर्भाव आहे, अधिकाऱ्यांनी कुठे भेट दिली अशी विचारणा केली असता सुभाष पवार या शेतकऱ्याने मंत्री आले म्हणून पहिल्यांदाच अधिकारी गावात आल्याचे सांगितले. 


उपाय शेतकऱ्यांना सांगा
बोंडअळीचा प्रादुर्भाव कसा कमी करता येईल, असा प्रश्न खोत यांनी अधिकाऱ्यांना विचारला. त्यावर अधिकाऱ्यांनी अळी कसे विष पचवते, त्यामागची शास्त्रीय कारणे पाच मिनिटे कथन केली. तेव्हा शेतकरी म्हणाले अहो, हे मंत्र्यांना कशाला सांगता, शेतकऱ्यांना सांगा. त्याचा फायदा आम्हाला होईल. यानंतर अधिकाऱ्यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते. खोत यांनी प्रत्येक अधिकाऱ्यांना या गावाला भेट दिली का, अशी विचारणा केली असता फक्त एक महिला अधिकाऱ्यांनीच भेट दिल्याचे समोर आले. 


दुचाकीवरून स्वारी
बाळापूरमध्ये आल्यानंतर शेताजवळ काही मुले गोळाफेक खेळत होते. तेथे थांबून खोत यांनी गोळा फेकला. शेताची पाहणी केल्यानंतर गावकऱ्यांनी गाव पाहण्याची विनंती केली. भानुदास खाडे या शेतकऱ्याने खोत यांना दुचाकीवरून गावात नेले. त्यांनी मंदिरात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सरकार शेतकऱ्यांसाठीच काम करत असून कर्जमाफीचा फायदा लवकरच मिळेल, असे खोत म्हणाले. 


एक गाव, एकाच शेतात पाहणी 
मंत्री बाळापूर तसेच महालपिंप्री या गावात जाणार होते. प्रत्यक्षात बाळापुरातील एकाच शेतकऱ्याच्या शेतात भेट देऊन काढता पाय घेतला. 


...अन् खोत, अधिकारी निरुत्तर 
बोंडअळीच्यानुकसानीची माहिती ऑनलाइन घेत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तेव्हा शेतकरी म्हणाले, सर्वच गोष्टी ऑनलाइन करता, ऑनलाइन कर्जमाफी देऊनही अद्याप आमच्या हाती एक पैसाही आला नाही. गावात डीपीची वीज कापली आहे. या गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा ऑनलाइनचे काय घेऊन बसलात, असा प्रश्न शेतकऱ्यांनी करताच अधिकारी खोत निरुत्तर झाले. 

बातम्या आणखी आहेत...