आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटाबंदीची काय सांगू कहाणी, ना कुणी राजा ना कुणी राणी !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद : "या नोटाबंदीची बाई काय सांगू कहाणी, ना कुणी राजा ना कुणी राणी’, "भ्रष्टाचाराच्या रोगाने जनता त्रस्त झाली, राजाने मग भूल देताच नोटाबंदीची सर्जिकल स्ट्राइक केली’ अशा एकाहून एक सरस स्वरचित कविता सादर करत स्पर्धकांनी मंगळवारी नोटाबंदीनंतरचे वास्तव चपखलपणे मांडले. 
स्वातंत्र्यसैनिक, कवयित्री, लेखिका सिंधुताई भालेराव यांना आदरांजली म्हणून सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी जागृती मंच महिला बहुउद्देशीय संस्था, जनशिक्षण संस्था बलवंत वाचनालय यांच्या वतीने "नोटाबंदी’याविषयावर काव्यवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक अशा २० स्पर्धकांनी सहभाग उत्स्फूतपणे नोंदवला. 
नोटाबंदीसारख्या विषयावर एकापेक्षा एक कविता सादर करत या स्पर्धकांनी या निर्णयानंतर आलेल्या अनुभवांचे शब्दरूप सादर केले. या निर्णयानंतर कुणाला कसा अन् किती त्रास झाला, याचे वर्णनही स्पर्धकांनी केले.
 
 नोटाबंदीची आवश्यकता, त्याचे राजकीय पटलावर उठलेले तरंग अन् सामान्यांना आलेल्या अडचणी, अशा अनेक मुद्द्यांना स्पर्श करत स्पर्धकांनी कविता सादर केल्या. उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत या कवितांना दाद दिली. प्रास्ताविक भारती भांडेकर यांनी केले. डॉ. अर्चना वैद्य, हेमलता लखमल यांनी सूत्रसंचालन केले. अस्मिता अवलगावकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भारती पवार, नेहा मुंडेवार, अंजली कुलकर्णी, शर्मिष्ठा रोडगे, ललिता चौधरी, लता गिरी यांनी परिश्रम घेतले.
 
यांनी पटकावली बक्षिसे 

परीक्षकम्हणून अनंत काळे, अॅड. नंदिनी देशपांडे यांनी काम पाहिले. प्रसिद्ध लेखिका डॉ. छाया महाजन , अॅड. मेघा देशमुख यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यात प्रथम पारितोषिक वंदना पाठक, द्वितीय रंजना तुळशी, तृतीय पांडुरंग जगताप, तर उत्तेजनार्थ बक्षीस मीनल चांदे, हरिश्चंद्र भूमकर यांनी पटकावले. स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र तसेच सहभागींना प्रमाणपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप होते. 
 
- बलवंत वाचनालयात झालेल्या स्पर्धेत स्पर्धकांनी मांडले नोटाबंदीनंतरचे वास्तव 
- कवितेतून मांडले नोटाबंदीचे राजकीय पटलावरील तरंग अन् सामान्यांची तारांबळ 
बातम्या आणखी आहेत...