आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घर, प्लॉट, फ्लॅट वा शेतजमीन घेताय...मग या बाबींची खातरजमा अवश्य करा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सामान्य माणूस पै-पै जमवून घर, प्लॉट, फ्लॅट किंवा शेतजमीन खरेदी करतो. आयुष्यभराची पुंजी त्यात खर्ची होते. पण अनेकदा ही मालमत्ता खरेदी करताना विविध प्रकारे फसवणूक होत असते. कधी विक्री करणारा फसवतो तर कधी यंत्रणा गफलत करते. बँकांच्या अकार्यक्षमतेमुळेही कशी फसवणूक होते हे आपण पहिल्या भागात पाहिले. त्यामुळे अशा मालमत्ता खरेदी करताना काय काळजी घेतली पाहिजे, कुठली कागदपत्रे पाहिली पाहिजेत, याची माहिती आज अंतिम भागात देत आहोत. सीनियर कन्सल्टंट या विषयातील तज्ज्ञ जे. सी. फ्रान्सिस यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे डीबी स्टारचा हा स्पेशल रिपोर्ट...
जे. सी. फ्रान्सिस
इक्विटेबल गहाणखत या प्रकारच्या कर्जासाठी मूळ खरेदीखत बँकेत जमा असते. नोंदणीकृत गहाणखत (रजिस्टर्ड मॉडगेज) असेल तर दुय्यम निबंधक कार्यालयात त्याची नोंद केलेली असते. वकिलाने व्यवस्थित सर्च रिपोर्ट दिला तर कर्ज असल्यास उघड होते.

कर्ज नसल्याची खात्री करण्यासाठी
{ मागील २० वर्षांपर्यंतचे फेरफार सातबारा तपासावेत.
{ साताराबामधील कॉलम दोनमधील इतर हक्काची, वारसाची, बँक बोजाची नोंद आहे काय, याची खात्री करावी.
{ शक्यतो संगणीकृत सातबारा घ्यावा.
{ वडिलोपार्जित जमीन असल्यास तोंडी वाटणीपत्र झालेली जमीन खरेदी करू नये. न्यायालय अथवा दुय्यम निबंधक कार्यालयात वाटणीपत्र झालेले असावे. वाटणीपत्रावर सर्वांच्या स्वाक्षऱ्या असाव्यात.
{ जमिनीवर महार हाडोळा, आदिवासी, शासकीय, मशीद, इनामी, ट्रस्ट असे आरक्षण नसल्याची खात्री करावी.
{ सामूहिक क्षेत्र म्हणजे भावंडांची जमीन असेल तर खरेदीखतावर सर्वांच्या स्वाक्षऱ्या घ्याव्यात.
बिल्डर्सकडून मालमत्ता खरेदी करताना…
{बिल्डर्सकडून घर, प्लॉट, फ्लॅट घेताना वकिलाकडून सर्च रिपोर्ट घ्यावा.
{ बिल्डरची फर्म ही पार्टनरशिप, कंपनी, प्रोप्रायटर, जॉइंट व्हेंचर यापैकी कुठल्या प्रकारातील आहे, हे पाहावे. तसेच नोंदणीपत्राचीही मागणी करावी.
{ फर्मच्या संचालक मंडळ, मालकांमध्ये बदल झाल्यास त्याची रीतसर नोंद झाल्याचे अधिकृत दस्तएेवज पाहावेत.
{ मंजूर नकाशाप्रमाणे बांधकाम आहे का, हे पाहावे.
{ डीड ऑफ डिक्लेरेशन खूप महत्त्वाचे असते. यात एकूण क्षेत्रफळ, बांधीव क्षेत्रफळ, सामूहिक मालमत्तेचा तपशील, सर्वांना समान हक्क राहतील अशी नोंद, एफएसआय किंवा टीडीआरचे हक्क सोसायटीच्या नावे असल्याच्या नोंदी यात असतात. त्यामुळे डीडी ऑफ डिक्लेरेशनची मागणी करा.
{ खरेदीपूर्वी एकूण किमतीच्या २० टक्के रक्कम देऊन दुय्यम उपनिबंधक कार्यालयात इसारपावती करून घ्यावी.
{ बिल्डर तोंडी किंवा ब्राऊचरच्या माध्यमातून सुविधांबाबत देत असलेल्या आश्वासनांची नोंद डीड ऑफ डिक्लेरेशनमध्ये अाहे काय, याची खात्री करावी.
{ बांधकाम पूर्ण झाल्यानंतर भोगवटा प्रमाणपत्र (कम्प्लिशन) घ्यावे.
{ एकूण प्लॉट, घर, फ्लॅटपैकी किमान ६० टक्के मालमत्तेची विक्री झाल्यास सर्व सभासदांची बैठक घेऊन सोसायटी, कंपनी किंवा अपार्टमेंट असोसिएशन या तीनपैकी बहुमत ज्या बाजूने असेल, त्याची नोंदणी करावी. यासाठी बिल्डरचे सहकार्य घ्यावे.
{ सोसायटी, कंपनी किंवा अपार्टमेंट असोसिएशन स्थापन करण्यापूर्वी बायलॉज् सर्व सभासदांना वाचून दाखवावा, तसेच तो सभेमध्ये मंजूर करावा.
{ सभासदांकडून घेतलेले वनटाइम मेंटेनन्स चार्ज किंवा कारपेस फंड सोसायटीच्या नावाने बँकेत जमा केल्याची खात्री करावी.
{ याशिवाय बिल्डरने टायटल व्हेरिफिकेशन केलेले आहे काय, एनए-४४ रेखांकन, नकाशा, बांधकाम परवानगी, बांधकाम नकाशा, सर्वाधिकारपत्र, ताबापत्राची मागणी करावी.
{ गुंठेवारी मंजुरीचे पत्र पाहावे.
{ विकास निधी (बेटरमेंट चार्ज) भरल्याची पावती पाहावी.

सोसायटीचे घर घेताना…
{विक्री करणारा व्यक्ती सोसायटीचा सभासद असल्याचे प्रमाणपत्र पाहावे.
{ विक्री करणाऱ्याच्या नावे अॅलॉटमेंट लेटर आहे काय, याची खात्री करावी.
{ विक्रेत्याचे शेअर सर्टिफिकेट पाहावे.
{ संस्थेचे सर्व प्रकारचे ड्युजचे पत्र पाहावे.
{ सेल डीड ओरिजिनल असल्याची खात्री करावी.
{ सर्व मूळ दस्तएेवजांची खात्री करावी.
{ वकिलामार्फत सर्च रिपोर्ट घ्यावा, तसेच वर्तमानपत्रात जाहीर प्रगटन द्यावे.
{ हस्तांतरण करताना संस्था अध्यक्षा, सचिवांची खरेदीखतावर सहमती म्हणून स्वाक्षरी घ्यावी.
{ मूळ मालकाने कर्ज घेतलेले असेल तर बँकेच्या परवानगीशिवाय खरेदीखत किंवा हस्तांतर करू नये.
{ साेसायटीने खरेदी केलेल्या जमिनीची सत्यप्रत पाहावी.
{ सातबारा वा चालू वर्षाचे पीआर कार्ड पाहावे.
{ एनए-४४ मंजुरी असल्याची खात्री करावी.
{ सोसायटीचे बेबाकी प्रमाणपत्र घ्यावे.
{खरेदीनंतर सोसायटीकडून ताबापत्र घ्यावे.
{ विक्री करणाऱ्याचे मूळ खरेदीखत पाहावे
{ अलीकडील काळातील सातबारा किंवा पीआर कार्डवरील नोंद पाहावी.
{ मूळ मालकाने कर्ज घेऊन परतफेड केलेली असल्यास बँकेचे बेबाक प्रमाणपत्र हक्क सोडपत्र घ्यावे.
{ मालमत्ता एकापेक्षा अधिक व्यक्तींच्या नावे असल्यास खरेदीखतावर सर्वांच्या स्वाक्षऱ्या घ्याव्यात.
{ वकिलामार्फत सर्च रिपोर्ट आणि वर्तमानपत्रातून जाहीर प्रगटन द्यावे.
{ पाणीपट्टी, वीजबिल, मालमत्ता कर, अकृषक कर केलेल्या पावत्या पाहाव्यात.
{ संयुक्त मालमत्ता असल्यास मालकांमधील एखाद्याचा मृत्यू झालेला असेल तर न्यायालयातून वारसाहक्क प्रमाणपत्र मिळवावे आणि मगच व्यवहार करावेत. अन्यथा नाही.
जुन्या मालमत्ता खरेदी करताना

फायनल ले-आऊट प्लॉट‌्स
{पूर्ण विकास निधी किंवा शहर विकास निधी भरणा केल्याची पावती पाहावी.
{ मंजूर नकाशाची छायांकित प्रत पाहावी.
{ सर्च रिपोर्ट पाहावा. तसेच खरेदी करण्यापूर्वी वर्तमानपत्रात जाहीर प्रगटन द्यावे.
{ ओपन टॅक्स भरल्याची पावती पाहावी.
{ सातबारा किंवा पीआर कार्डच्या नोंदी पाहाव्यात.
{ एनए-४४ असल्याची खात्री करावी.
{ बेटरमेंट चार्ज भरता महापालिका किंवा ग्रामीण टाऊन प्लॅनिंग विभाग हे तात्पुरत्या स्वरूपाचे रेखांकन मंजूर करते. बरेचवेळा विकासक स्वत: रेखांकन तयार करतात. यालाच टेंटेटिव्ह ले-आऊट म्हणतात.
{ पूर्ण ले-आऊट पाहावे. नकाशा पाहावा, त्यासोबत काही अटी-शर्ती असतील त्यांचे व्यवस्थित वाचन करावे.
{ दोघांमध्ये एक प्लॉट घ्यायचा असेल तर सब डिव्हिजन (तुकडे) होईल काय, याची खात्री करावी.
{ त्या जमिनीचा अकृषक परवाना पाहावा. एन-४४ असेल तर सर्वात चांगले. नसेल तर दंड आकारून ४७ (b) केल्याची खात्री करावी.
{ एन-४५ असेल तर व्यवहार करूच नये.
{ ग्रामपंचायतीने मंजूर केलेले ले-आऊटमधील प्लॉट‌्स घेऊ नयेत. ग्रामपंचायतीला ले-आऊट मंजुरीचे अधिकार नाहीत. ग्रामीण भागातील ले-आऊटसाठी ग्रामीण टाऊन प्लॅनिंग विभाग असतो.
{ एनएची फीस नियमित भरलेली असावी.
बातम्या आणखी आहेत...