आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे रुळावर कधी येणार? बॉटनिकल गार्डनमधील ट्रेन प्रोजेक्ट रखडला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडकोएन-८ मधील बॉटनिकल गार्डनमधे मिनी ट्रेन आली. मात्र, ती रुळावर कधी येईल हे सांगणे कठीण. दीड वर्षापूर्वीच हा प्रकल्प पूर्ण व्हायला हवा होता; पण अधिकाऱ्यांच्या वेळखाऊ धोरणामुळे ५५ लाखांचा चुराडा होऊनही आतापर्यंत केवळ २० टक्के काम झाले आहे. त्यातही नवाकोऱ्या रुळाचा वापरही होता तो खराब झाला आहे. मनपाने दोन्ही ठेकेदारांची बिले थांबवल्याने प्लास्टिक आच्छादनात झाकून ठेवलेली नवी कोरी रेल्वेही तशीच आणखी किती दिवस गंजत पडेल, हे सांगता येत नाही.
हे उद्यान तब्बल एकर परिसरात पसरलेले आहे. त्यातील ४०० मीटर जागेवर मिनी ट्रेन प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी तत्कालीन शालेय शिक्षणमंत्री राजेद्र दर्डा यांनी सन २०१३ -१४ च्या विशेष निधीतून ३० लाख रुपये उपलब्ध करून दिले. तिकीट घर, ओव्हरब्रिज सुरक्षिततेच्या दृष्टीने ट्रेन ट्रॅकच्या दोन्ही बाजूंनी तार फेन्सिंग तसेच प्लॅटफॉर्म उभारण्यासाठी मनपा फंडातून तत्कालीन मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी २५ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकाला तत्काळ मंजुरी देऊन निधीही उपलब्ध करून दिला.
२५०मीटर अंतराचा ट्रॅक
मिनीट्रेन आणि ट्रेन ट्रॅक उभारणीचा ठेका नागपूरच्या भारतीय सहकारी संघ संस्था मर्यादित या निमशासकीय कंपनीला देण्यात आला होता. या कामासाठी मनपाने २४ ऑगस्ट २०१४ रोजी कार्यारंभ आदेशही दिला. कंपनीने मिनी ट्रेन आणि ट्रेन ट्रॅक उपलब्ध करून देण्याची जबाबदारी परतवाड्यातील मदन इंजिनिअरिंगचे ज्ञानेश्वर माहुले यांच्याकडे दिली. त्यांनी तीन महिन्यांत २५० मीटर लांबीचा लोखंडी ट्रेन ट्रॅक तयार केला. यासाठी साडेसात लाख रुपये खर्च करण्यात आला, तर २२ लाख ५० हजार रुपये किमतीची एचपी डिझेल इंजिनची बोगींसह मिनी ट्रेन उद्यानात आणून ठेवली. सध्या ही ट्रेन अच्छादनात गुंडाळून ठेवण्यात आली आहे.
एक काम करताना दुसऱ्या कामाचे वाटोळे
मिनीट्रेनसाठी तिकीट घर, ओव्हरब्रिज सुरक्षिततेच्या दृष्टीने ट्रेन ट्रॅकच्या दोन्ही बाजूंनी तार फेन्सिंग, प्लॅट फॉर्म, बुकिंग हाऊस इत्यादी कामाकरिता मनपा फंडातून २५ लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. याचा ठेका एलोरा कन्स्ट्रक्शनचे अन्वर खान यांना देण्यात आला. हे काम करताना मालाची ने-आण करण्यात आली. यात बांधकाम साहित्याची जड वाहने ट्रॅकवरून गेल्याने तयार झालेल्या रुळाचे वाटोळे झाले.

दुरुस्तीवरून वाद
आताया ट्रॅकची दुरुस्ती कोणी करावी यावरून वाद सुरू झाला आहे. मनपाने दोन्ही कंत्राटदारांची देयके थांबवल्याने ही दुरुस्ती कधी होणार, हे सांगता येत नाही.
ट्रेन ट्रॅकचे काम १९ दिवसांत पूर्ण करून दिले. या कामाचे ३० लाखांचे बिल अद्याप मिळालेले नाही. मनपाच्या २५ लाख निधीतून मिनी ट्रेनसाठी तिकीट घर, ओव्हरब्रिज, दोन्ही बाजूंनी तार फेन्सिंग, प्लॅटफॉर्म ही कामेही अपूर्ण आहेत. ही कामे करताना ट्रॅकचे नुकसान झाले. आता विनामोबदला त्याच्या दुरुस्तीचे काम मलाच करावे लागणार. चूक एकाची, ताप आम्हाला, असा हा प्रकार आहे. ज्ञानेश्वरमाहुले, मार्केटिंगवितरण प्रमुख, मदन इंडस्ट्रीज, परतवाडा
ट्रॅकच्या खाली खडीचे मजबुतीकरण करताना ठेकेदाराने त्यावरून वाहने चालवली. त्यामुळे त्याचे नुकसान झाले आहे. त्या ठेकेदारामार्फत आम्ही तो विनाशुल्क दुरुस्त करून घेणार आहोत. ट्रेन आणि ट्रॅकच्या ठेकेदाराला देयके दिल्याने त्याने काम थांबवले आहे. ट्रॅकवरून त्यांनी ट्रेनची चाचणी दिली आहे. लवकरच इतर कामे पूर्ण करून ट्रेन सुरू करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. अफसर सिद्दिकी, कार्यकारी अभियंता, मनपा.