आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाडेकरूच जेव्हा मालकी दाखवतो..

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - भाडेकरू म्हणून राहायला आला, खरेदीखत बनवले, जीटीएलनेदेखील लाइटचे मीटर भाडेकरूच्या नावाने करून दिले. याच आधारावर बँकेचे कर्ज फेडून घर विक्री करण्याचा प्रयत्न केला आणि खर्‍या घरमालकालाच बेघर केले, मात्र भाडेकरी आपणच मालक असल्याचा दावा करत आहे. कशा प्रकारे जमिनीचे व्यवहार गुंतागुंतीचे केले जाऊ शकतात, त्याचेच हे एक उदाहरण..

एकाचे घर दुसर्‍याला विकणे, एकच घर अनेकांना विकणे असे प्रकार शहरात सातत्याने घडत आहेत. ही प्रकरणे हाताळण्यासाठी पोलिस आयुक्तालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला, परंतु या कक्षातर्फे कोणतीच ठोस कारवाई केली जात नसल्याची नागरिकांची कायम ओरड आहे. विश्रातीनगर भागातील प्रल्हाद निवृत्ती पिल्ले यांचे घर एका भाडेकरूने बळकावले आहे. खोटी कागदपत्रे तयार करून भाडेकरूच घर विकण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रकरणात पोलिसांची भूमिकाही संशयास्पद वाटत आहे. भाडेकरू मात्र ‘मी नाही त्यातला’ म्हणत आपणच खरे मालक असल्याचे सांगत आहे.

भाडेकरू म्हणून आला आणि.. : एसटी महामंडळात कंडक्टर असणारे प्रल्हाद निवृत्ती पिल्ले यांनी 1999 मध्ये मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनजवळील विश्रातीनगरात 10 हजार रुपयांत प्लॉट घेतला. यावर बांधकामासाठी त्यांना 2 लाख रुपये खर्च आला. वर्षभर ते या घरात राहिल्यानंतर 2008 मध्ये त्यांनी खालच्या दोन खोल्या ओळखीच्या कल्याण करनोळ यांना, तर वरच्या खोल्या दुसर्‍या एका व्यक्तीला भाड्याने दिल्या. करनोळ नियमितपणे भाडे देत होते. फिरतीची नोकरी असल्यामुळे पिल्ले यांचे घराकडे येणे कमी व्हायचे. याचाच फायदा घेत करनोळ यांनी या घरावर कब्जा केल्याचा आरोप पिल्ले यांनी केला आहे.

कर्जही फेडण्याचा प्रयत्न : घराच्या बांधकामासाठी पिल्ले यांनी जय मल्हार नागरी पतसंस्थेकडून 60 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. करनोळ यांना हे घर विकण्यासाठी कर्ज फेडणे आवश्यक होते. यासाठी त्यांनी परस्पर पतसंस्था गाठली आणि त्यांच्याकडे कर्ज फेडण्याचा प्रयत्न केला, पण पतसंस्थेने याची माहिती पिल्ले यांना दिली. यावर पिल्ले यांनी त्यांना कर्जाचे पैसे घेऊ नका, असे आवाहन केले. तसे पत्रच त्यांनी पतसंस्थेला दिले आहे. हे पत्र डीबी स्टारकडे आहे.


आयुष्याची पुंजी गेली
घाम गाळून, उपाशी राहून पैसा जमवला आणि हे घर बांधले. बँकेचे कर्ज फेडताना माझी दमछाक होत आहे. तिकडे करनोळ यांनी माझे हक्काचे घर हडपले आहे. पोलिसही मला दाद देत नाहीत.
प्रल्हाद पिल्ले, तक्रारदार


पिल्लेंची नियत फिरली
हे घर मी पिल्ले यांच्याकडून 2008 मध्ये विकत घेतले आहे. तसे खरेदीखत माझ्याकडे आहे, पण आता घराच्या किमती वाढल्यामुळे पिल्ले यांची नियत फिरली आहे. मी आता थेट न्यायालयात दाद मागणार आहे.


कल्याण करनोळ, घर बळकावण्याचा आरोप असलेले आमच्या अखत्यारीतला विषय नाही
आमच्याकडे पिल्ले यांच्या तक्रारी आल्या आहेत, पण हा विषय आमच्या अखत्यारीतला नाही. घरात राहणार्‍या भाडेकरूला पोलिसांना काढता येत नाही. तसे केल्यास आम्हीच अडचणीत येतो. पिल्ले यांनी थेट न्यायालयात धाव घ्यावी. त्यांच्याकडे कागदपत्रे असतील तर त्यांना घर परत मिळेल.
भीमराव मोरे, पोलिस निरीक्षक, मुकुंदवाडी पोलिस ठाणे


घोळात घोळ
डीबी स्टारने याबाबत तपास केला असता काही महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत.
0 घराचे मूळ खरेदीखत पिल्ले यांच्या नावावर आहे.
0 पहिल्या मालकाकडून ही जागा विकत घेतल्याचे पुरावेही त्यांच्याकडे आहेत.
0 महापालिकेकडून येत असलेल्या नोटिसा, मालमत्ता कर भरल्याच्या पावत्यादेखील पिल्ले यांच्याच नावावर आहेत.
0 सिडको कार्यालयामध्येही पिल्ले यांच्या नावावरच ही जागा आहे.
0 गुंठेवारीच्या नोटिसा आणि करही पिल्ले यांनीच भरल्याचे पुरावे आहेत.
0 या तुलनेत करनोळ यांच्याकडे वीज बिल, 100 रुपयांच्या बाँडवरील खरेदीखत आणि गेल्या वर्षीची मालमत्ता कराची नोटीस आदी कागदपत्रे आहेत. यामुळे प्रकरण अधिकच गुंतागुतीचे झाले आहे.


पोलिस आयुक्तांच्या निर्देशांचे काय?
सातारा परिसरात मालमत्ता बळकावण्याच्या प्रकरणांना ऊत आला आहे. याची गंभीर दखल घेत पोलिस आयुक्त संजय कुमार यांनी हे प्रकार थांबवण्यासाठी खास पावले उचलली होती. त्यांनी अशी प्रकरणे खास पद्धतीने हाताळण्याचे निर्देश सर्व पोलिस ठाण्यांना दिले होते. एवढेच नव्हे, तर न्यायासाठी त्रस्त नागरिक थेट आपल्याशीही संपर्क साधू शकतात, असेही त्यांनी जाहीर केले होते. मात्र, या प्रकरणात तर कायद्याचे रक्षकच कारवाई करण्यास तयार नसल्याचे प्रथमदर्शनी तरी वाटते.