आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना घ्यायचा की औरंगाबाद?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद-आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेससोबतच्या वाटाघाटीत जागांची अदलाबदल झाल्यास राष्ट्रवादीने औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ घ्यायचा की जालना, यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रात्री 9 ते 10 या वेळेत सुभेदारी विर्शामगृहावर बंद दाराआड चर्चा केली.

पवार दुपारी 4 वाजता शहरात आले. मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांतील नियोजन आराखड्याची बैठक संपल्यावर 8 वाजेनंतर शहरातील दोन कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार होते. शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांच्या मुलाचा वाढदिवस तसेच अन्य एका राष्ट्रवादी कार्यकर्त्याकडे ते जाणार होते; परंतु ते थेट सुभेदारीवर गेले. तेथे बंद दाराआड त्यांनी खासदार जनार्दन वाघमारे, आमदार संजय वाघचौरे व सतीश चव्हाण, शहर कार्याध्यक्ष विनोद पाटील यांच्या उपस्थितीत चर्चा केली. लोकसभेचा औरंगाबाद की जालना मतदारसंघ जिंकता येईल, हा या चर्चेचा विषय होता. सतीश चव्हाण स्वत: लोकसभेसाठी इच्छुक आहेत. त्याला वाघचौरे यांनीही अनुकूल मत व्यक्त केल्याचे समजते. दोनपैकी एक मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात येणार हे स्पष्ट असून दोन्हीपैकी सुरक्षित कोणता, असा त्यांच्या चर्चेचा आशय होता. त्यावर एकमत होण्यास एक तास लागला. त्यानंतर जाहीर कार्यक्रम रद्द करून पवार यांनी आराम करणे पसंत केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजेश टोपे इच्छुक असतील, तरच जालना घेतला जाईल.
नियोजन समितीच्या आढावा बैठकीत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार. या वेळी मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतील पालकमंत्री व विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल उपस्थित होते. छाया : मनोज पराती

व्यग्र वेळापत्रकानंतर पवारांचा आराम


अजित पवार आज दिवसभर व्यग्र होते. सकाळी 8 वाजता ते नाशिक येथे दाखल झाले. तेथील विभागीय बैठक आटोपून ते पुन्हा मुंबईला गेले. शरद पवार यांचा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ते पुन्हा औरंगाबादेत आले. उद्या सकाळी 6 वाजता ते विदर्भाकडे रवाना होणार आहेत.