आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैजापूर तालुक्यात होतेय धवलक्रांती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खंडाळा - वैजापूर तालुक्यातील बाहेगावची ओळख आता दुधाचे गाव म्हणून होत आहे. सव्वाशे उंब-यांच्या गावात शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळले. गावात आजमितीस 2400 संकरित गाई असून त्यापासून दररोज 26 ते 27 हजार लिटर दूध संकलन होते. या दुधाची आवक पाहून कोपरगाव व राहाता येथील दूध कंपन्यांनी थेट गावातून दूध खरेदी सुरू केल्याने येथील शेतक-यांचे राहणीमान उंचावले आहे. प्रत्येक घरात 10 ते 15 संकरित गाई असून दररोज संकलित होणा-या दुधातून किमान पाच लाखांची उलाढाल होते.


वैजापूर-औरंगाबाद महामार्गावर असलेल्या झोलेगाव पाटीपासून तीन किलोमीटर अंतरावर शिवना नदीच्या काठावर बाहेगाव हे छोटेसे गाव वसलेले आहे. गावाची लोकसंख्या जरी 540 असली तरी दुग्ध व्यवसायातून प्रत्येकाच्या हाताला काम मिळाले आहे. शिवना नदीच्या काठी वसलेल्या गावात दुष्काळाची झळ पोहोचलीच नाही. येथील
शेतकरी शेती केवळ जनावरांच्या हिरव्या चा-यासाठी करतात.


अशी मिळाली प्रेरणा
शेतीव्यवसायातून घर तर चालायचे, मात्र आर्थिक व्यवहारात अडचणी येत असत. त्यात गावात शेतीशिवाय इतर व्यवसाय नसल्याने पाच वर्षांपूर्वी गावातील राघोबा चेळेकर व नानासाहेब
चेळेकर यांनी दहा संकरित गाई आणल्या. दुधाचे रोजचे संकलन पाहून परिसरातील इतर शेतकरीदेखील या व्यवसायाकडे वळले.


बचत गटांमुळे भरारी
संकरित गाईपासून मिळणारे दूध उत्पादन मोठ्या प्रमाणात असल्याने लोक या व्यवसायाकडे वळत होते. सरपंच रावसाहेब वांगे यांनी 2009-10 मध्ये ग्रामस्थांची बैठक घेऊन गोमाता बचत गटाची स्थापना केली. या गटात गावातील प्रत्येक घरातून एका व्यक्तीचा सहभाग होता. प्रत्येकी एका कुटुंबाला दोन संकरित गार्इंचे वाटप करण्यात आले. यासाठी त्यांनी प्रारंभी महाराष्‍ट्र बँकेचे अर्थसाहाय्य घेतले अन् प्रत्येक घरात जोमाने दूध व्यवसाय सुरू झाला. दोन वर्षांत कर्जाची परतफेड केली.


कंपन्या आल्या दारी
गावात अडीच हजार संकरित गाई व त्यापासून दररोजचे निघणारे 26 हजार लिटर दूध विक्रीसाठी अडचणीला सामोरे जावे लागत होते. यासाठी गावातील काही प्रतिष्ठित व ग्रामपंचायतीच्या मंडळींनी नगर जिल्ह्यातील कोपरगाव व राहाता येथील नामांकित दूध कंपन्यांच्या अधिका-यांची भेट घेतली. कंपनीच्या अधिका-यांनी गावाची पाहणी करून थेट गावातूनच दूध संकलन करणे सुरू केले. वेळेत पैसे, योग्य भाव यामुळे दूध उत्पादकांच्या अडचणी दूर झाल्या. ठोक रक्कम हातात पडत असल्याने गावात दूध व्यवसाय भरभराटीस आला.


अशी होते उलाढाल
> 10 ते 15 लिटर दूध एका संकरित गाईपासून
> 20 रुपये प्रतिलिटर भाव दुधाला
> 2400 संकरित गाई गावात
> 27 हजार लिटर दूध प्रतिदिन संकलन
> 5 लाख रुपये रोजची उलाढाल


विक्रीसाठी अडचणी
गावात मोठ्या प्रमाणात दूध संकलन होत होते. विक्रीसाठी देवगाव, वैजापूर व औरंगाबाद येथे डेअरी, हॉटेल व घरगुती ठिकाणी दुधाची विक्री करत असत. मात्र यात वाहतूक खर्च, वेळेत पैसे न मिळणे आदी प्रकारच्या अडचणी येत होत्या. त्यामुळे गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी यावर तोडगा काढत कंपन्यांशी संपर्क साधला.
गावात सर्वांनी संकरित गार्इंच्या माध्यमातून पाच वर्षांपूर्वी दूध व्यवसाय सुरू केला. व्यवसायात लाखोंची उलाढाल होत आहे. सध्या गावाची ओळख दुधाचे गाव म्हणून रुजत आहे. गावात दूध प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. रावसाहेब वांगे, सरपंच

गावात मोठ्या प्रमाणावर दूध व्यवसाय सुरू आहे. सर्वांच्या हातालादेखील या व्यवसायामुळे काम मिळत असल्याने दुष्काळाच्या झळा गावात पोहोचल्याच नाहीत.
नानासाहेब चेळेकर, ग्रामस्थ