आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • White Toping News In Marathi, Aurangabad Municipal Corporation, Divya Marathi

व्हाइट टॉपिंगसाठी पाणी देणार नाही,महानगरपालिकेने ठेकेदाराला सुनावले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - महानगरपालिकेने व्हाइट टॉपिंगच्या कामांची थाटात सुरुवात केली असली तरी काँक्रीटच्या क्युरिंगसाठी ठेकेदाराला पाणी देण्यास हात वर केले आहेत. त्यांची त्यांनी खासगी व्यवस्था करावी, मनपा पाणी देणार नाही, असे स्पष्ट सांगितल्याने ऐन उन्हाळय़ात एकाच वेळी व्हाइट टॉपिंगचे अधिकाधिक रस्ते घेण्यास ठेकेदार नाखुश आहे. परिणामी रस्त्यांचे न्यायालयात दिलेले वेळापत्रक पाळले जाईल की नाही याविषयी शंका निर्माण झाली आहे.
औरंगाबाद शहराची नाचक्की करणारे रस्ते दुरुस्त करण्याच्या कामाला कसातरी मुहूर्त लागला. 44 कोटी रुपये खचरून 20 रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यापैकी 16 रस्ते व्हाइट टॉपिंगचे आहेत. या 16 पैकी जळगाव रोड ते मध्यवर्ती जकात नाका आणि सावरकर चौक ते सतीश पेट्रोल पंप या दोन रस्त्यांची कामे वेगात सुरू आहेत. तसेच क्रांती चौक ते पैठण गेट रस्त्याच्या कामाला आता प्रारंभ झाला आहे.

व्हाइट टॉपिंग हा काँक्रीटचाच प्रकार असल्याने पाण्याची मोठी गरज भासते. कारण रस्ता खरवडून काढल्यावर त्यावर चार इंचांचा पातळ काँक्रीटचा रसायनमिर्शित थर टाकल्यावर त्यावर ते मिर्शण घट्ट करण्यासाठी पाणी लागते. शिवाय नंतर साडेसहा इंचांचा काँक्रीटचा थर टाकल्यावर त्याचे क्युरिंग किमान 14 दिवस करावे लागते. त्यासाठी प्रचंड प्रमाणावर पाणी लागणार आहे.


मनपा प्रशासनाचा नकार
एसबीआय चौक ते पाण्याच्या टाक्या या भागाचे सध्या पहिल्या थराचे काम सुरू आहे. तेथे आता लवकरच मोठा थर टाकण्याचे काम सुरू होणार असून त्यासाठी क्युरिंगकरिता पाण्याची गरज भासणार आहे. या कामाच्या वेळीच मनपाने ठेकेदाराला पाण्याची व्यवस्था तुमची तुम्ही करा, असे स्पष्ट सांगितले आहे. त्यामुळे मनपाऐवजी आता खासगी विहिरी शोधून तेथून पाणी आणण्याची व्यवस्था ठेकेदारालाच करावी लागणार आहे. उन्हाळय़ात येणारे पाण्याचे संकट पाहता खासगी पाणीही मिळवताना ठेकेदाराला अडचण निर्माण होणार आहे. यासंदर्भात कार्यकारी अभियंता अफसर सिद्दिकी यांनी सांगितले की, नागरिकांना पिण्याचे पाणी देणे याला मनपाचे प्राधान्य असल्याने रस्त्यांच्या कामांना पाणी देता येणार नाही. म्हणून ठेकेदारांनाच त्यांची सोय करावी लागणार आहे.


रस्त्यांची कामे लांबणार?
व्हाइट टॉपिंगची कामे एकाच ठेकेदाराला देण्यात आली आहेत. त्यांनी आधी चार रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत. नंतर पुढील कामे हाती घेणार असे जाहीर केले आहे. पण जर जास्तीत जास्त कामे सुरू केली तर पाणीही अधिक लागणार आहे. पण ते उपलब्ध करणे अवघड व खर्चिक काम असलयाने रस्त्यांची कामे किमान पावसाळय़ापर्यंत तरी संथगतीने होणार आहे. दुसरीकडे उच्च न्यायालयात मनपाने रस्त्यांचे वेळापत्रक दिले असले तरी अशा अडचणींमुळे ते वेळापत्रक पाळले जाईल की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


किती लागणार पाणी?
सध्या एसबीआय चौक ते पाण्याच्या टाक्यापर्यंतच्या भागाचे काम सुरू आहे. तेथे एकदा काँक्रिटीकरण झाले की पाण्याचा सतत पुरवठा लागणार आहे. दिवसाला किमान 25 टँकर लागणार आहेत. अशा स्थितीत ऐन उन्हाळय़ात कामाने वेग घेतल्यावर पाणी उपलब्ध करून घेण्यासाठी ठेकेदाराला धावाधाव करावी लागणार आहे. कारण काँक्रिटीकरण झाल्यावर तो पृष्ठभाग कोरडा ठेवणे महागात पडणार आहे.