आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सप्टेंबरअखेर पूर्ण होणार व्हाइट टॉपिंग रस्त्याची कामे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भूमिगत गटार योजनेचे काम संपून महिना उलटला तरी रस्त्यांच्या कामाला प्रारंभ होत नाही. त्यामुळे गजानन महाराज मंदिर ते जयभवानीनगर चौक आणि सेव्हन हिल्स ते सूतगिरणीपर्यंतच्या रस्त्याचे ६०० मीटर व्हाइट टॉपिंगचे काम थांबले आहे. हे काम सप्टेंबरअखेरीस पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी भूमिगत गटार योजनेचे काम करणाऱ्या ठेकेदाराने खोदलेल्या ठिकाणी मुख्य थर टाकायचा तर व्हाइट टॉपिंगचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडून अपूर्ण काम पूर्ण करून घेतले जाणार आहे.
शहरातील पाच रस्ते व्हाइट टॉपिंगचे करण्यासाठी शासनाकडून मनपाला २४ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. यात तुकोबानगर, कामगार चौक, गजानन महाराज मंदिर ते जयभवानीनगर चौक, सेव्हन हिल्स ते सूतगिरणी चौक आणि बाबा पेट्रोल पंप ते क्रांती चौक या पाच रस्त्यांचा समावेश होता. यापैकी तुकोबानगर आणि कामगार चौकातील ५०० मीटरच्या दोन्ही रस्त्यांची कामे झाली आहेत. तर जयभवानीनगर आणि सूतगिरणी रस्त्यांचे काम दोन महिन्यांपासून अपूर्ण आहे. याबाबत “दिव्य मराठी’ने माहिती घेतली असता भूमिगतसाठी खोदलेल्या रस्त्यावर व्हाइट टॉपिंग रस्ता करण्यास ठेकेदाराने हरकत घेतली आहे. एक तर डांबरी रस्ता बनवा अथवा मुख्य थरांचे काम करून द्या, असा आग्रह जीएनआय कन्स्ट्रक्शनने धरला आहे. ही दोन्ही कामे करण्यास मनपा असमर्थ असल्याने दोन महिन्यांपासून रस्ते पूर्ण करण्यावर कोणताच पर्याय सापडत नव्हता. विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी कामाची पाहणी करून दोन महिन्यांच्या आत कामे सुरू करण्याचे आदेश दिले होते. यात पुढाकार घेऊन बकोरिया यांनी भूमिगत गटार योजनेचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडूनच रस्त्याचा मुख्य बेस तयार करून घेण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले असल्याने व्हाइट टॉपिंगचे रस्ते पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सप्टेंबरपर्यंत काम पूर्ण करण्यावर भर
या दोन्ही रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी भूमिगत गटार योजनेच्या कामांची अडचण आली अाहे. हे काम करणाऱ्या ठेकेदाराकडून मूळ बेस तयार करून घेणार आहोत. त्यानंतर व्हाइट टॉपिंगचे काम करून घेतले जाईल. ही सर्व कामे सप्टेंबरपर्यंत करण्यावर आमचा भर आहे. ओमप्रकाश बकोरिया, मनपा आयुक्त

थर नसल्याने हरकत
भूमिगतसाठी ठेकेदाराने रस्ते तीन ते पाच फुटांपर्यंत खोदल्याने जमीन भुसभुशीत झाली. यावर थेट व्हाइट टॉपिंग करणे योग्य नाही. तसे केल्यास स्ताच उखडून जाऊ शकतो. त्याबाबत पाच-सहा पत्रेही ठेकेदाराने मनपाला दिली होती. मनपाने लेखी तोंडी सूचना देऊन भूमिगतच्या ठेकेदाराकडून काम करून घेण्यास सांगितले. मात्र कशा पद्धतीने काम करावे हेच स्पष्ट केले नाही. मुख्य बेस तयार करण्यासाठी ७० लाख रुपये खर्च येतो. हा खर्च कोण करणार, असा पेच असल्याने रस्त्याचे कामच पुढे सरकत नव्हते.
बातम्या आणखी आहेत...