आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हाइट टॉपिंगची कामे पूर्ण करा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - रेल्वेस्टेशन ते क्रांती चौक रस्त्याचे काम निधी असूनही बंद पडलेले आहे. या रस्त्याची पाहणी गुरुवारी (८ नोव्हेंबर) खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली होती. तसेच अधिकाऱ्यांना फैलावरही घेतले होते. खैरे यांच्याकडून पश्चिम मतदारसंघात सुुरू असलेली लगबग बघून आठ दिवस होण्यापूर्वीच पश्चिम मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांनी शनिवारी मनपा आयुक्त प्रकाश महाजन यांची दुपारी दोन वाजता भेट घेऊन बंद पडलेली व्हाइट टॉपिंगची कामे अगोदर पूर्ण करण्याच्या सूचना केल्या.

शहरातील इतर कामे निधीअभावी बंद पडली आहेत. मात्र, रेल्वेस्टेशन ते क्रांती चौक रस्ता अर्धा झाला असून अर्धा अपूर्ण आहे. यासाठी निधीही महानगरपालिकेकडे आहे. मात्र, कंत्राटदारांच्या अडचणीमुळे आणि मनपाच्या दुर्लक्षामुळे हे काम बंद पडल्याचे शिरसाट यांनी सांगितले. हॉटेल पंजाबसमोरील जागेचा मोबदला अडीच कोटी रुपये आहे. संबंधितांकडून मनपाला दीड कोटी रुपये करापोटी भरायचे आहेत. कराची रक्कम न घेता आणखी एक कोटी रुपये त्यांना देऊन जागा मनपाच्या ताब्यात घेण्याची सूचनाही त्यांनी केली. त्यावर दोन दिवसांत करार करणार असल्याचे आश्वासन आयुक्त महाजन यांनी दिले. त्याचबरोबर निधीअभावी शहरातील इतर कामेही अपूर्ण राहिली आहेत. ही कामे पूर्ण करण्यासाठी मार्ग काढू, असे शिरसाट यांनी सांगितले. तसेच भाडेकरू ठेवणारे मालक आणि दुकाने, गाळे भाड्याने देणाऱ्या व्यापाऱ्यांनी सर्व माहिती मनपाकडे जमा करणे आवश्यक आहे. मात्र, तसे होत नाही. काही आपदा आल्यास भाडेकरूंची माहिती समोर येत नाही. त्यासाठी भाडेकरूंची माहिती तपासून घेण्यात यावी. तसेच नगरसेवकांचे कॉल घेत जा, सध्या सुरू असलेले मतभेद टाळण्यासाठी त्यांना भेटण्याची सूचनाही शिरसाट यांनी आयुक्तांना केली.
अविश्वास ठरावास अप्रत्यक्ष विरोध
ठोस कारण असल्यास नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी अविश्वास ठराव घ्यावा. कुणाचे मन दुखावण्यासाठी असे पाऊल उचलू नये. त्याबाबत मला फारशी माहिती नाही, मात्र अशी वेळ आल्यास योग्य भूमिका घेण्यात येईल, असेही शिरसाट यांनी सांगितले.