आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद शहरातील त्याला रस्ता कसे म्हणावे?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - टीव्ही सेंटर ते हडको कॉर्नर हा अवघा एक किलोमीटरचा रस्ता पाच मिनिटांत पार होऊ शकतो, पण सध्या तुम्ही या रस्त्यावरून गेलात, तर किमान 20 मिनिटे लागतात, कारण या रस्त्यावर फक्त खड्डेच खड्डे आहेत.

डिसेंबर 2009 मध्ये या रस्त्याचे काम झाले. पालिका निवडणुकीपूर्वी हा रस्ता गुळगुळीत झाला. मात्र, गेल्या पावसाळ्यात या रस्त्याचे पितळ उघडे पडले. डिफर पेमेंट नावाचा प्रकार त्या वेळी नव्हता. त्यामुळे काम पूर्ण झाल्याचे दाखवून ठेकेदार पसार झाला. या कामाचा ठेका कोणी घेतला होता, याची माहिती पालिकेच्या अधिकार्‍यांकडे नाही. पालिकेच्या वतीने कामावर देखरेख कोण ठेवत होते, याची माहिती फाइल बघूनच सांगणे शक्य असल्याचे पालिकेचे अधिकारी सांगतात. खर्च किती झाला, हेही आता आठवत नाही. टीव्ही सेंटर पार करण्यापूर्वी शंभरावर खड्डय़ांतून मार्ग काढावा लागतो. या रस्त्यावरून सर्वाधिक रिक्षा धावतात. त्यानंतर दुचाकी आणि चारचाकींचा क्रमांक लागतो. तासाला 500 वाहने या रस्त्यावरून धावतात.


रस्त्याची लांबी : 1 किलोमीटर
रुंदी :25 मीटर
यापूर्वी झालेले काम : 2009
आलेला खर्च : पालिका अधिकार्‍यांनाही माहिती नाही.


काम लवकर हाती घेऊ
यापूर्वी या रस्त्याचे काम कधी झाले, हे मला सांगता येणार नाही. खड्डय़ांच्या तक्रारी आहेत. पाहणी करून लवकर काम हाती घेऊ. हेमंत कोल्हे, प्रभारी शहर अभियंता.


कर भरतो तर काम व्हावे
खड्डे चुकवताना पाठदुखी आपोआपाच होते. सिडको-हडकोचे नागरिक कर भरतात. तेव्हा येथील रस्त्यांची कामे व्हायलाच हवीत. संतोष व्यवहारे, रहिवासी, भारतमातानगर.

मोजण्यापलीकडे खड्डे
रस्त्यावरील खड्डे मोजण्यापलीकडे आहे. त्यामुळे मीही या रस्त्याने जाण्याचे टाळतो. पाऊस उघडल्यानंतर नव्याने काम हाती घ्यावे, यासाठी मी स्वत: आंदोलन करणार आहे. राज वानखेडे, नगरसेवक, हडको, एन-11