आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Why Should Modi Not Visit Drought Hit Marathwada ?

दुष्काळग्रस्त मराठवाड्याचा दौरा मोदींनी का नाही केला?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठवाड्यात प्रचंड दुष्काळ आहे, चारा छावण्यांचे अनुदान रोखले आहे, रोहयोच्या मजुरांकडून अधिकचे काम करून घेऊन तुटपुंजा मोबदला दिला जात आहे, टँकर लॉबी आर्थिक घोटाळे करत आहे, असे आरोप करत माकपच्या ज्येष्ठ नेत्या वृंदा कारत यांनी ‘केंद्र सरकारच्या मदतीसाठी राज्यात भाजपचे सरकार निवडा’ म्हणत मतांचा जोगवा मागणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठवाड्याचा दौरा का केला नाही, असा संतप्त सवाल केला.

पुस्तक प्रकाशनासाठी शहरात आलेल्या कारत यांनी दुष्काळी दौरा आटोपल्यानंतर सोमवारी (२५ एप्रिल) पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी त्यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

बीड, जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातील २० गावे आणि २०० शेतकऱ्यांना भेटून आल्यानंतर सोमवारी त्यांनी विभागीय आयुक्त डाॅ. उमाकांत दांगट यांना निवेदन दिले. त्यात त्यांनी घणाघाती आरोप केले. चारा छावण्यांना प्रती जनावर ७० रुपये दिल्याचे सरकार म्हणते, पण प्रत्यक्षात चारा छावण्यांत जनावरांच्या पडणाऱ्या शेणाचे रुपये कापून घेत आहे. दुष्काळात शेणाचे पैसे कापणाऱ्या सरकारने मदतीच्या नावाखाली शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे. मराठवाड्यात पाण्याची प्रचंड टंचाई आहे. मोफत टँकर हव्या त्या गावांना जाता भलत्याच ठिकाणी जाऊन टँकर लॉबी पाण्याचा व्यापार करत आहे.

रोहयोच्या महिला मजुरांची संख्या वाढत आहे. त्यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार किलो माती काढल्याशिवाय मोबदला दिला जात नाही. दिलेच तर १९१ ऐवजी १२५ रुपये दिले जात आहेत. ऊसतोड कामगारांचे स्थलांतर होत आहे. पाण्याविना जनावरे तडफडून मरत आहेत. ७० हजारांची बैलजोडी ३० हजारांना विकली जात आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना याचे काहीच गांभीर्य नाही. येथील खासदारांनादेखील काही देणेघेणे नाही. डाव्या पक्षांचे खासदार मात्र संसदेच्या आगामी अधिवेशनात मराठवाड्याच्या प्रश्नांवर भांडणार असल्याचे कारत म्हणाल्या.

किसान सभेतर्फे 3 मे रोजी आक्रोश सत्याग्रह
दुष्काळ,शेतीमालाचे भाव आणि कर्जमुक्तीसंदर्भात किसान सभेतर्फे आंदोलन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या, आगामी हंगामात पुरेसे बियाणे, खते औषधे द्या, श्रमिकांना दोन रुपये प्रतिकिलो दराने धान्य द्या आदी मागण्यांसाठी मे रोजी विभागीय आयुक्त कार्यालयावर बेमुदत शेतकरी आक्रोश सत्याग्रह पुकारण्यात येणार आहे. या वेळी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. अशोक ढवळे, किसन गुजर, अर्जुन आडे, रामकृष्ण शेरे, डॉ. अजित नवले, उद्धव पौळ आदींनी केले आहे. विभागीय आयुक्तांना वृंदा करात यांचे शिष्टमंडळ भेटले त्या वेळी पी. एस. घाडगे, डॉ. भाऊसाहेब झिरपे, बी. पोटभरे आणि बी. भुंबे आदींची उपस्थिती होती.