आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनैतिक संबंधात अडसर ठरल्यामुळे सुपारी देऊन पतीचा खून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - अनैतिक संबंधात अडसर ठरणार्‍या पतीचा 40 हजार रुपयांत सुपारी देऊन खून करणारी आरोपी पत्नी, तिचा प्रियकर व एका तरुणाला पोलिसांनी अटक केली. ही घटना वाळूज महानगरातील ए.एस. क्लबच्या पाठीमागील भागात बुधवारी उघडकीस आली. धारदार चाकूने खून केल्यानंतर पत्नीने दिवसभर मृतदेह घरात ठेवला. बहीण व इतर दोघांच्या मदतीने तो जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. युवराज बाबूराव ढगे (32, रा. असरवाडा, ता. निलंगा) असे मृताचे नाव आहे.
युवराज हे पत्नी श्वेता, मुलगी कृष्णरागिणी, मुलगा शुभम यांच्यासोबत वाळूजमध्ये राहत होते. श्वेताची 17 वर्षीय बहीण शहरातील एका महाविद्यालयात पॉलिटेक्निकच्या दुसर्‍या वर्षात शिकते. तीसुद्धा श्वेताच्या घरी राहते. युवराज यांचा वाळूजमध्ये क्रेनचा व्यवसाय आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी फुलंब्री तालुक्यातील साताळा गावातील योगेश नंदू सांगळे (19) याला सुपरवायझर म्हणून कामावर ठेवले. पत्नी श्वेता (26) हिचे योगेशसोबत सुपारी देऊन पतीचा खून सहा महिन्यांपासून अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. याची कुणकुण लागल्याने पती-पत्नीत दररोज वाद होत होते. त्यानंतर युवराज यांनी योगेशला कामावरून काढले. त्यामुळे श्वेताही त्रस्त होती. तिने युवराजचा काटा काढण्याचा निर्णय घेतला आणि योगेशला याची कल्पना दिली. त्याप्रमाणे सुपारी देऊन खून करण्याचे ठरले. योगेश, श्वेताने रवी पंडितराव गाडेकर (25, रा. पोखरी केंदळे, ता. मंठा) याला 40 हजारांत सुपारी दिली.

असा काढला काटा
4 ऑगस्ट रोजी मध्यरात्री पती-पत्नीत वाद सुरू झाला. तेव्हा लपून बसलेले योगेश व रवी समोर आले. योगेशला पाहताच युवराज यांचा पारा चढला. योगेशने त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून चाकूने गळ्यावर, पोटावर व मांडीवर वार केले. युवराज जागीच गतप्राण झाले. योगेश तेथेच मुक्कामी थांबला तर रवी निघून गेला. मंगळवारी दिवसभर मृतदेह घरातच होता. रात्री 9.30 वाजता नॅनोमध्ये (एमएच 20 बीवाय 4237) मृतदेह टाकून श्वेता, तिची बहीण व योगेश साताळ्याच्या दिशेने निघाले. लाडसावंगी रस्त्यावर मोरहिरा शिवारात पहाटे दोनच्या सुमारास मृतदेहावर पेट्रोल टाकून काडी लावली व तिघे साताळ्याला गेले.

मेहुणीने पेट्रोल ओतले, पत्नीने लावली काडी
फुलंब्रीकडे जाताना तिघांनी पेट्रोल बाटलीत घेतले होते. मेहुणीने मृतदेहावर पेट्रोल ओतले तर निर्दयी श्वेताने काडी ओढून पेटवून दिले. बुधवारी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास ते परतत असताना मृतदेह जळाला की नाही पाहण्यासाठी पुन्हा घटनास्थळाकडे गेले. श्वेताने छावणीतील पोलिस कर्मचार्‍याला मोबाइलवर पतीला जाळल्याचे सांगितले. त्याने वाळूज एमआयडीसी पोलिसांना सांगितले. युवराजने बहिणीची छेड काढल्याने पतीचा खून केल्याचे खोटे सांगितले, तर चिमुकल्या शुभमने वडिलांच्या डोळ्यात मिरची टाकल्याचे पोलिसांना सांगितल्यामुळे या प्रकरणाचे बिंग फुटले आणि रवीला पोलिसांनी अटक केली.