आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीचा खून; पतीला जन्मठेपेची शिक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - क्षुल्लक कारणावरून भांडण उकरून काढून पत्नीला फुंकणीने मारहाण केली. यात महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पतीस मुख्य न्यायाधीश एस. एम. कोल्हे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

कन्नड तालुक्यातील बोलटेक येथील भास्कर सुदाम मोरे याचा पत्नी कवितासोबत क्षुल्लक कारणावरून वाद झाला. या वादाचे पर्यवसान भांडणात झाले. संतापलेल्या भास्करने पत्नीला फुंकणीने मारहाण केली. या मारहाणीत ती बेशुद्ध झाली आणि तिला वांत्या झाल्या. वांत्या झाल्यानंतर भास्कर शेजारी धावत गेला व तेथील शीलाबाई रमेश गायकवाड हिला कविताला वांत्या होत असल्याचे सांगितले. शीलाबाई कविताला पाहण्यासाठी घरात गेली असता तिला कविता बेशुद्धावस्थेत आढळली. कविताला उपचारासाठी तातडीने कन्नड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पोलिस निरीक्षक खुशाल शिंदे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

या खटल्यात मुख्य न्यायाधीश एस. एम. कोल्हे यांच्यासमोर सुनावणी झाली. सहायक सरकारी वकील सुदेश शिरसाट यांनी सात साक्षीदार तपासले. यात शीलाबाई, डॉ. गिते, डॉ. दाभाडे, पोलिस उपनिरीक्षक भातनाथ यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली भास्कर मोरेला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पाचशे रुपये आर्थिक दंड व दंड न भरल्यास एक महिना सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.