आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोहित्राची अर्थिंग कटल्याने वायरमधून रिटर्न सप्लाय, आठ जणांना शॉक, एकजण गंभीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना/सोयगाव देवी- घरातील वीजेवर चालणाऱ्या विद्युत उपकरणांमध्ये विद्युत प्रवाह उतरल्यामुळे आठ जणांना शॉक बसला असून एकाची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, गंभीर जखमीवर भोकरदन येथील एका खासगी रुग्णालयात उपचार असून अन्य जणांना उपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. भोकरदन तालुक्यातील कोदोली गावात सोमवारी सकाळी १० वाजेदरम्यान ही घटना घडली. यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. 

समाधान गिरणारे, सुमनबाई गिरणारे, रंजनाबाई गाढे, औचित मगरे, समाधान शिंदे, रामेश्वर गिरणारे, गणेश गिरणारे ओंकार गिरणारे अशी या जखमींची नावे आहेत. सोमवारी सकाळी १० वाजेदरम्यान घरात विद्युतप्रवाह उतरल्याची बातमी काही मिनिटात गावभर पसरली. दरम्यान, विजेच्या बोर्डात लावलेले मोबाईल चार्जर काढण्यासह बटन बंद करताना अनेकांना शॉक बसला. 

दरम्यान, यातील आठ जणांना ताबडतोब भोकरदन येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. यात समाधान गिरणारे यांची तब्यत गंभीर असून त्यांच्यावर तज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू आहेत. भोकरदन तालुक्यातील कोदोली गावालगत सिंगल फेजचे एक राेहित्र आहे. मात्र, त्याठिकाणी खडकाळ जमीन असल्यामुळे रोहित्राला पुरेशी आर्थिंग मिळत नाही. तसेच हा रोहित्र ओव्हरलोडेड असल्यामुळे फ्युज उडणे, केबळ जळणे असे प्रकार नेहमीचेच झाले आहेत. 

ग्रामस्थांनी अनेकवेळा याविषयी तक्रारी केल्या मात्र, वीज वितरण कंपनीचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात. तसेच गेल्या सहा महिन्यापासून गावात लाईनमन नसल्यामुळे तांत्रिक बिघाड झाल्यास गावातील लोकच जीव धोक्यात घालून ते काम करतात. कोदोली गावाची लोकसंख्या २२०० असून गावात ४३० घरे आहेत. तसेच ३०० विद्युत ग्राहक आहेत. 

दरम्यान, गावात गेल्या सहा महिन्यापासून लाईनमन नसल्याने ग्रामस्थांना जीव मुठीत धरून रात्री-अपरात्री रोहित्रावर फ्युज टाकावा लागतो. दरम्यान, आता लवकरच पावसाळा सुरू होणार आहे. यामुळे वीज कंपनीने मान्सुनपूर्व कामांमध्ये रोहित्राचीही दुरूस्ती करून घ्यावी. अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकते असे ग्रामस्थांचे म्हणने आहे. तसेच शॉक बसलेल्या कुटूंबातील सदस्यांमध्ये सध्या भितीचे वातावरण आहे. 

असा शॉक लागला
कोदोली येथील रहिवाशी समाधान गिरणारे हे सकाळी मोबाईल चार्जिंगला लावण्यासाठी गेले असता, त्यांना विजेचा शॉक बसला ते बेशुध्द पडले. तसेच सुमनबाई गिरणारे यांना लाईटचे बटन बंद करताना तर रंजनाबाई गाढे यांना मोबाईल चार्जिंगला लावताना औचित मगरे यास पत्राचा शॉक बसला. तसेच समाधान शिंदे हे बोर्डातील बटन बंद करत होते. तसेच सुरेश गिरणारे यांनासुद्धा बोर्डाला हात लावताच शॉक बसला. दरम्यान, प्रमोद गिरणारे यांची एलईडी टीव्ही जळुन खाक झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. 

रोहित्रामधील आर्थिंगचेकाम करण्यासाठी अनेकवेळा वीज कंपनीकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, त्याचे पुढे काहीच झाले नाही. त्यामुळे सोमवारी विद्युत उपकरणांतून विद्युत प्रवाह उतरून अनेक लोकांना शॉक बसला. दरम्यान, गावातील नवीन रोहित्राला मंजुरी मिळाली असून लवकरात-लवकर ते बसवावे, जेणेकरून अशा घटना घडणार नाहीत, अशी मागणी करणार आहोत. 
- भगवान गिरणारे, सरपंच, कोदोली, ता. भोकरदन

दुरुस्ती करण्यात येईल 
भोकरदन तालुकयातील कोदोली गावात काही नागरीकांना विजेचा शॉक बसल्याचे मला सकाळी समजले. यामुळे मी तातडीने गावात पाहणीसाठी एक पथक पाठवले आहे. रोहित्रात काही अडचणी असल्यास त्याची दुरूस्ती करण्यात येईल, असे शाखा अभियंता ए. पी. औटे म्हणाले. 

जोराचा झटका बसला 
सकाळी घरासमोरील लोक विद्युत प्रवाह घरातील विद्युत उपकरणात उतरल्याची चर्चा करत होते. यामुळे मीसुद्धा बोर्डाला लावलेले चार्जर मोबाईल काढण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी वीजेचा शॉक बसल्याचे कोदोली येथील ग्रामस्थ सुमनबाई गिरणारे म्हणाल्या. 
बातम्या आणखी आहेत...