आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरटीओ - वाहनचालकांना मिळतात चक्क विनापरीक्षा परवाने

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - प्रादेशिक परिवहन विभागात दररोज शेकडो नागरिक वाहन चालविण्याचा परवाना घेण्यासाठी अर्ज करीत असतात. यापैकी काहींना कायद्यान्वये वाहन चालविण्याची टेस्ट द्यावी लागते तर काहींना मात्र वाहन न चालविताच परवाना देण्यात येतो. त्यामुळे शास्त्रशुद्ध पद्धतीने वाहन चालविता येत नसले तरी वाहनाचा परवाना मिळत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. यासंदर्भात 15 मार्च रोजी ‘दिव्य मराठी’ने सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. यानंतर विभागप्रमुखांनी काही तांत्रिक बदलही केले होते. मात्र, दोन महिन्यांनंतर पुन्हा ‘जैसे थे’ स्थिती पाहावयास मिळत आहे.
मोटार वाहन कायद्यान्वये एखाद्या वाहनचालकाला वाहन चालविण्याचा परवाना देण्याआधी त्याला वाहन निरीक्षकासमोर वाहन चालविण्यासाठी परीक्षा देणे आवश्यक असते. मात्र, प्रादेशिक परिवहन कार्यालयात यासंदर्भात कोणतेच ठोकताळे तपासले जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे. वाहनचालकाला शिकाऊ परवाना दिल्यानंतर तो वाहन चालविण्यास सक्षम आहे किंवा नाही याची तपासणी केल्यानंतरच त्याला परवाना देणे आवश्यक आहे. मात्र यासंदर्भात असलेल्या नियमांना तिलांजली देत वाहनचालकाला वाहन चालविण्याचा परवाना देण्यात येत असतो. वाहनचालकाला वाहन चालविता येत नसेल किंवा वाहन चालविण्याचे नियम माहिती नसल्यास अशा वाहनचालकाची पुन्हा परीक्षा घेऊन त्याला वाहन परवाना देणे आवश्यक आहे. सतत तीन वेळा टेस्टमध्ये वाहनचालक अपात्र ठरल्यास त्याला परवाना नाकारण्याचे अधिकार परिवहन विभागाला आहेत. मात्र, एजंटमार्फत आलेल्या वाहनचालकाला शक्यतो पहिल्याच टेस्टमध्ये पास करण्यात येते. वाहन परवाना देण्यात येतो. त्यामुळे वाहन निरीक्षक व एजंट लोकांची मिलीभगत असण्याची शक्यता आहे. परिस्थिती सुधारण्याची मागणी होत आहे.
दिवसाला दोनशे परवाने - प्रादेशिक परिवहन विभागात दररोज 150 ते 200 अर्ज प्राप्त होत असतात. या अर्जदारांना सुरुवातीला तात्पुरते परवाने वितरीत करण्यात येतात. एक महिन्याचा कालावधी संपल्यानंतर वाहनधारकांना नवीन परवाने देण्यात येतात. आतापर्यंत एका वर्षात या कार्यालयाकडून 50 हजार परवाने वितरीत करण्यात आले आहेत. मात्र या पैकी किती जणांना वाहन चालविता येते किंवा नाही हा एक संशोधनाचा भाग आहे.
निर्देश आहेत
यासंदर्भात सर्व वाहन निरीक्षकांना निर्देश देण्यात आलेले आहेत. चुकणार्‍याला शिक्षा आहे, असा प्रकार असल्यास नाव सांगावे, तक्रारदारांनी पुढे यावे. त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. संजय ससाणे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
‘दिव्य मराठी’ने वेधले लक्ष - 15 मार्च रोजी वाहन परवाना वितरणासंदर्भात ‘दिव्य मराठी’ने सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. या वेळी वाहनचालकांना परवाना देताना नियमांची पायमल्ली होत असल्याचे चित्र ‘दिव्य मराठी’ने मांडले होते. यासंदर्भात परिवहन विभागाने परवाना वितरण करताना वाहन चालकाशेजारी वाहन निरीक्षकाने बसून वाहनाची टेस्ट घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. याचे काही दिवस काटेकोरपणे पालन करण्यात आले. मात्र, सध्या जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे. वाहनचालकाला परवाना मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारची हालचाल करावी लागत नसल्याचे चित्र आहे. वाहनचालकाची वाहन चाचणीदेखील नावालाच घेण्यात येत आहे. काही वाहनचालकांना तर चाचणीचीही आवश्यकता नसते. तर काहींना मात्र काटेकोर नियमांचे बंधन आहे. ज्या वाहनचालकाच्या परवाना काढण्याच्या अर्जावर एजंटचे नाव नसेल त्याला अवास्तव अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराकडे वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष घालणे आवश्यक आहे.