आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Without Author Permission Drama Of Last Sin Change For Debate

लेखकाच्या परवानगीविना नाटकाचा शेवट बदलल्याने वाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- समांतर रंगभूमीवर चर्चेत असलेल्या ‘गोडसे@गांधी डॉट कॉम’ नाटकाचा शेवट लेखकाच्या परवानगीविना बदलल्याने वाद निर्माण झाला आहे. असा बदल केल्याबद्दल लेखकासह नाट्यक्षेत्रातील मान्यवरांनी नाराजी व्यक्त केली असली तरी दिग्दर्शक त्याविषयी ठाम असून त्यांनी बदल असलेलाच प्रयोग २६ नोव्हेंबर रोजी राज्य नाट्य स्पर्धेत सादर करण्याचे ठरवले आहे.

नथुराम गोडसेच्या खुनी हल्ल्यानंतर गांधीजी जिवंत राहिले असते तर, अशी कल्पना करत असगर वजाहत यांनी गोडसे@गांधी डॉट कॉम नाटक लिहिले. अहिंसेचे पुजारी असलेले गांधीजी गोडसेविरुद्ध न्यायालयात साक्ष देण्यासही नकार देतात. त्यामुळे नथुरामला फक्त पाच वर्षांची शिक्षा होते. मग गांधीजी बिहारातील एका छोट्या गावात समाजसेवा करू लागतात.
सरकारविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवून त्यांना त्यांच्याच आग्रहावरून नथुराम जेथे शिक्षा भोगत असतो त्या बराकीत ठेवले जाते. तेथे कट्टर हिंदुत्ववादी नथुरामला गांधीजी हिंदू धर्मातील अनेक पदर उलगडून दाखवत पराभूत करतात. अखेर नथुरामही गांधींच्या मार्गावर निघतो, असा शेवट वजाहत यांनी केला आहे. तो दिग्दर्शक प्रा. गणेश िशंदे यांनी बदलला. गांधीजींची हत्या होते. नथुराम प्रवृत्ती जिवंत राहते आणि तीच नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, कलबुर्गींची हत्या करत आहे, असा शेवट त्यांनी केला आहे.

त्याबद्दल मान्यवरांनी नाराजीसह काही आक्षेप मांडले आहेत. नाट्य अभ्यासक, समीक्षक श्रीकांत उमरीकर म्हणाले की, हिंसेचे समर्थन करणारे ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा कम्युनिस्ट विचारांच्या पानसरेंना गांधीजींच्या रांगेत उभे करणे योग्य नाही. नाटककार, साहित्यिक समीक्षक प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे यांच्या मते गोडसे प्रवृत्ती जिवंत आहेच. लेखकाच्या परवानगीविना संहिता बदलाचा अधिकार दिग्दर्शकाला नाहीच. त्याचा मुद्दा योग्य असला तरी जागा चुकली आहे. डॉ. शिंदे म्हणाले की, दिग्दर्शकाच्या भूमिकेतून संिहतेतील एक विचार ठामपणे मांडण्याचा प्रयत्न मी केला आहे.

वादनाट्य
...हा तर माझ्या विचारांना धक्का
माझ्यापरवानगीविना शेवट बदलला असेल तर ते मला मान्य नाही. कारण अशा शेवटामुळे मी जो विचार करून लेखन केले, त्यालाच धक्का बसत आहे. असगर वजाहत, लेखक

प्रेक्षकांवर सोडा अंतिम निर्णय
लेखकालाअपेक्षित नसलेल्या बाबी आक्रमक पद्धतीने मांडणे चुकीचे आहे. जे काही सांगायचे आहे ते प्रसंगाच्या माध्यमातून सांगावे. प्रेक्षकांवर अंतिम निर्णय सोडावा. डॉ. प्रा. दिलीप घारे, ज्येष्ठरंगकर्मी