आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Without Lifting Reservation, Land Aquaition Possible For Aurangabad Airport

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

२० वर्षांपासूनचे आरक्षण उठवले तरच विमानतळासाठी भूसंपादन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - विमानतळ प्राधिकरणासाठी संपादित करावयाच्या १८४ एकर जमिनीच्या संपादनासाठी विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी बोलावलेल्या बैठकीत सोमवारी तोडगा निघू शकला नाही. १९९५ ला झालेल्या भूसंपादनाच्या वेळी केलेल्या कराराची अजून अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे आधीचा वाटा द्या, त्याचबरोबर गेल्या २० वर्षांपासून येथे टाकलेले आरक्षण मागे घेण्यात यावे आणि नंतरच बोलणी करा, असे शेतक-यांनी ठणकावून सांगितले. त्यामुळे पंधरा दिवसांनी पुन्हा बैठक घेण्याचे या वेळी ठरले.

दांगट यांनी बोलावलेल्या बैठकीस जिल्हाधिकारी विक्रमकुमार, उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, शेतकरी बापूसाहेब दहिहंडे, उत्तम खोतकर, शेषराव भागाजी खोतकर, ज्ञानेश्वर जाधव, सिराज पटेल, नानासाहेब बकाल, शेख मसूद, सुधाकर नवपुते उपस्थित होते. १९९५ मध्ये विमानतळ विस्तारीकरणासाठी १५० एकर जमीन संपादित केली. सिडकोकरून संपादित झालेल्या जमिनीपोटी सिडकोने मोबदल्याबरोबरच विकसित भागाचा साडेबारा टक्के वाटा दिला. दुसरीकडे शासनातर्फे संपादित केलेल्या जमिनीपोटी साडेबारा टक्के विकसित जमीन देण्यात आली नाही. त्यामुळे २० शेतकरी नाराज आहेत.

गुगलवर दिसते मोकळी जागा
विमानतळ प्राधिकरणासाठी संपादनासाठी पैसे नाहीत. त्यामुळे शासनाने जमीन द्यावी, अशी त्यांची मागणी असते. त्यातच बांधकामे न झाल्याने दिल्लीस्थित अधिकारी जेव्हा विमानतळाची संभाव्य जागा गुगलवर मोकळी दिसते, त्यामुळे करा संपादन, असा सल्ला दिला जातो, हा प्रकार थांबला पाहिजे, अशी सूचनाही या वेळी शेतक-यांनी केली.

विकसित जमीन ताब्यात द्या
२० वर्षांपासून आम्ही विकासापासून दूर आहोत. त्यामुळे येथील आरक्षण उठवावे. जेव्हा भूसंपादन करायचे ठरले तेव्हा जमीन देऊ; १९९५ च्या संपादनावेळी ठरल्यानुसार साडेबारा टक्के विकसित जमीन ताब्यात मिळाल्याशिवाय आम्ही भूसंपादन होऊ देणार नाही म्हणजे नाहीच.
बापूसाहेब दहिहंडे, शेतकरी.

दर मिळाला तरच जमिनी देऊ
जमीन जाणार म्हणून अनेक शेतक-यांनी धास्ती घेतली. ८ ते १० जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकतर जमिनी तातडीने भूसंपादन करून ताब्यात घ्याव्यात किंवा आम्हाला यातून मोकळे करण्यात यावे. बाजारभावाच्या दुप्पट दर मिळाला तरच आम्ही जमिनी देऊ.
भाऊसाहेब वाघ, बाधित शेतकरी व माजी उपमहापौर.

आरक्षण वाढवण्याच्या हालचाली
भविष्यात जमीन विमानतळासाठी संपादित होणार असल्याने १९९५ मध्येच या जमिनीवर विमानतळासाठी आरक्षित असा ठपका होता. तेव्हापासून जमिनीचे व्यवहार होत नाहीत. त्यामुळे विकास नाही. आजूबाजूला मोठमोठ्या इमारती झाल्या; पण १८३ हेक्टर जमीन तशीच पडून आहे. येथे इच्छा नसूनही शेतक-यांना शेतीच करावी लागते. त्यातच नव्या विकास आराखड्यात हे आरक्षण पुन्हा वाढवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.